गतविजेती सायना नेहवाल महिला एकेरीचा किताब पुन्हा जिंकण्यापासून फक्त एका पावलाच्या अंतरावर आहे. याचप्रमाणे जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या किदम्बी श्रीकांतने एक लाख २० हजार अमेरिकन डॉलर्स पारितोषिक रकमेच्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पध्रेच्या अंतिम फेरीत दिमाखात स्थान मिळवले आहे.
बाबू बनारसी दास इनडोअर स्टेडियमवर चालू असलेल्या या स्पध्रेत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाला अंतिम फेरी गाठणे मुश्कील झाले नाही. सायनाने थायलंडच्या निकॉन जिंडापोनचा २१-१०, २१-१६ अशा फरकाने सहज पराभव केला. सायनाची अंतिम फेरीत दोन वेळा जागतिक कांस्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू आणि माजी विश्वविजेत्या कॅरोलिना मरिन (स्पेन) यांच्यातील विजेत्याशी गाठ पडेल.
श्रीकांतने सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरी गाठताना गतवर्षी इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकणाऱ्या एच. एस. प्रणॉयला पराभूत केले. अव्वल मानांकित श्रीकांतने पहिला गेम गमावला; परंतु तरीही एक तास चार मिनिटे चाललेल्या लढतीत १२-२१, २१-१२, २१-१४ अशा फरकाने प्रणॉयला पराभूत केले.