सय्यद मोदी ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पर्धा
भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता पारुपल्ली कश्यप लखनौ येथे सुरू होणार असलेल्या सय्यद मोदी ग्रां. प्रि. स्पर्धेत जेतेपद कायम राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. दुखापतीच्या कारणास्तव सायनाने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली होती. सायनाच्या अनुपस्थितीत सिंधूने लौकिकाला साजेसा खेळ करत जेतेपदाची कमाई केली. हाच फॉर्म कायम राखण्यासाठी सिंधू उत्सुक आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धाच्या दोन कांस्यपदकासह पाच आंतरराष्ट्रीय स्पर्धाची जेतेपदे नावावर असणाऱ्या सिंधूला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसादात दमदार खेळ करण्याची संधी आहे.
प्रीमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धेत सायनाने अवध वॉरियर्सचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र पायाच्या दुखापतीमुळे सायना बहुतांशी लढतींत खेळलीच नाही. उपांत्य फेरीच्या लढतीत सायनाला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेली नसतानाही सायनाला भारतात होणाऱ्या या महत्त्वपूर्ण स्पर्धेत सहभागी व्हावे लागणार आहे. महिलांमध्ये बेई युआन ज्यू, सायाका साटो आणि युई हाशिमोटो यांसारख्या तुल्यबळ प्रतिस्पध्र्याचा सामना सायना आणि सिंधूला करावा लागणार आहे. कोरियाची स्युंग जि ह्य़ुआन सगळ्यात धोकादायक प्रतिस्पर्धी मानली जात आहे. दुसरीकडे गतविजेत्या कश्यप पोटरीच्या दुखापतीतून सावरत आहे. प्रीमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धेत कश्यपला चमकदार कामगिरी करता आली नाही. मलेशिया स्पर्धेत उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागलेल्या किदम्बी श्रीकांतला जेतेपदाची सर्वोत्तम संधी आहे. दुखापतीतून सावरलेला आरएमव्ही गुरुसाईदत्तला आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप उमटवण्याची हुकमी संधी आहे. गेल्या हंगामात कामगिरीत चढउतारांना सामोरे गेलेला एच.एस. प्रणॉय चीनच्या ह्य़ुआंग युक्सिआंगविरुद्ध सलामीची लढत खेळणार आहे. सौरभ आणि समीर वर्मा ही बंधूंची जोडी स्पर्धेचे आकर्षण असणार आहे. आनंद पवार आणि अजय जयराम यांना पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागणार आहे. महिला दुहेरीत ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीला सहावे मानांकन देण्यात आले आहे. मनू अत्री आणि सुमीत रेड्डी यांच्या कामगिरीवर साऱ्यांचे लक्ष असेल. प्रणव चोप्रा आणि अक्षय देवलकर पुरुष दुहेरीत, तर अश्विनी पोनप्पा मनू अत्रीच्या साथीने खेळणार आहे.