भारताची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल आणि माजी विश्वविजेती इन्टानोन रॅटचानोक यांची थायलंड मास्टर्स फायनल्स बॅडमिंटन स्पध्रेच्या अंतिम फेरीत गाठ पडण्याची शक्यता आहे. एक लाख २० हजार अमेरिकन डॉलर्स पारितोषिक रकमेची ही स्पर्धा बँकॉकमध्ये ८ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेली सायना आपल्या नव्या हंगामाचा प्रारंभ सय्यद मोदी ग्रां. प्रि. गोल्ड स्पध्रेने करणार आहे. याचप्रमाणे थायलंड मास्टर्सचे जेतेपद पटकावून आत्मविश्वासाने ऑलिम्पिककडे वाटचाल करण्याचा तिचा इरादा आहे.
स्पध्रेच्या वेळापत्रकात अव्वल मानांकित बॅडमिंटनपटू सायनाला प्रारंभीचा मार्ग सोपा आहे. सिंगापूरच्या जियायुआन चेनशी तिची सलामी रंगणार आहे. मग उपांत्यपूर्व फेरीत सहाव्या मानांकित बुसानन ओंगबमरंगफानशी सामना होईल. त्यानंतर उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानावर असलेल्या चीनच्या सन यू हिच्याशी तिची लढत होऊ शकेल. २०१३ मधील चीन खुल्या स्पध्रेत सनने सायनाला हरवले होते. सायनाने तिच्यावर पाच वेळा मात केली आहे.
सायना अजून आपल्या सर्वोत्तम फॉर्मात नाही. याचप्रमाणे तिच्या पायावरील दुखापतीवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे नुकत्याच झालेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये सायना अवध वॉरियर्सच्या सर्व सामन्यांत खेळू शकली नव्हती. भारताच्या तन्वी लाडला सलामीच्या सामन्यात अमेरिकेच्या राँग श्ॉफरचे आव्हान असेल. रॅटचानोकसाठीसुद्धा सुरुवातीला मोठे आव्हान नाही. भारताच्या सायली राणेविरुद्ध तिचा सलामीचा सामना आहे. उपांत्यपूर्व फेरीत सहकारी निकाओन जिंदापोलशी तिचा सामना होण्याची शक्यता आहे. तर उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाच्या जि-ह्यूनशी तिचा सामना होऊ शकेल. पुरुषांमध्ये राष्ट्रकुल विजेत्या परुपल्ली कश्यपची पहिली लढत कोरियाच्या क्वांग ही हीओशी होणार आहे. आनंद पवार थायलंडच्या तवान ह्युआनसुरियाचा सामना करणार आहे. याचप्रमाणे समीर वर्मा आणि हर्षिल दाणी अनुक्रमे किआन यीव (सिंगापूर) आणि लिओ मुनाझ (मेक्सिको) यांच्याविरुद्ध लढणार आहेत.