श्रीकांत, कश्यप, प्रणॉयचेही आव्हान संपुष्टात
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सायना नेहवालला डेन्मार्क सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. पुरुष गटात पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत, एच. एच. प्रणॉय या त्रिकुटासह मनू अत्री आणि सुमित रेड्डी जोडीचेही आव्हान संपुष्टात आले.
या स्पर्धेसाठी तंदुरुस्त राहण्यासाठी सायनाने कोरिया स्पर्धेतून माघार घेतली होती. २०१२मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी सायना जेतेपदाची दावेदार होती. मात्र जपानच्या मिनात्सू मितानीने सायनावर २१-१८, २१-१३ असा विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये १०-१० अशी बरोबरी होती. मात्र त्यानंतर मितानीने सातत्याने गुण मिळवत पहिला गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्येही ६-६ अशा बरोबरीनंतर मितानीने आक्रमक पवित्रा स्वीकारला. तडाखेबंद स्मॅशेस, क्रॉसकोर्ट, ड्रॉप आणि नेटजवळून सुरेख खेळ करत मितानीने दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.
तत्पूर्वी, पुरुषांमध्ये इंडोनेशियाच्या टॉमी सुगर्तोने किदम्बी श्रीकांतला २१-१५, २१-१७ असे नमवले. बुधवारी रात्री झालेल्या लढतींमध्ये सलामीच्या मलेशियाच्या ली चोंग वेईने सलामीच्या लढतीतच पारुपल्ली कश्यपवर २१-१४, २१-१५ असा सहज विजय मिळवला. तैपेईच्या ह्य़ुस्यू जेन हाओने प्रणॉयवर २३-२१, १९-२१, २१-१५ अशी मात केली.
पुरुष दुहेरीत तैपेईच्या ली शेंग म्यू आणि साइ चिआ सिन जोडीने मनू अत्री-सुमित रेड्डी जोडीचा २१-१९, २०-२२, २१-१९ असा पराभव केला.