भारताची फुलराणी म्हणून ओळख मिळवलेल्या सायना नेहवालने पुन्हा एकदा माजी प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्यासोबत सराव करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘साई’ने (Sports Authority of India) नेमून दिलेले इंडोनेशियन प्रशिक्षक म्युलो हांदोयोदेखील सायनाला आता मार्गदर्शन करणार आहेत. या निर्णयामुळे गेल्या ३ वर्षांपासून प्रशिक्षक विमल कुमार आणि सायना नेहवाल यांची जोडी आता तुटणार आहे. या कालावधीत सायनाने जागतिक क्रमवारीत आपली कामगिरी सुधारत अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये पदकंही मिळवली.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सायनाने या निर्णयाची माहिती दिली. यावेळी विमल कुमार यांनी ३ वर्षे आपल्यासाठी जी मेहनत घेतली, त्याचेही सायनाने आभार मानले.

२०१४ साली सायनाने गोपीचंद यांची अकादमी सोडून विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सायना हैदराबादवरुन बंगळुरुलाही गेली होती. आशियाई खेळ, उबर चषक सारख्या महत्वाच्या स्पर्धांमध्ये अधिक चांगला खेळ करता यावा, यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचं वक्तव्य सायनाने केलं होतं.

सायनाने घेतलेल्या निर्णयाला प्रशिक्षक विमल कुमार यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. “जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून भारतात परत आल्यानंतर सायनाने मला गोपीचंद यांच्यासोबत सराव करण्याबद्दल विचारलं होतं. सायना आणि सिंधू या दोन्ही खेळाडू भारतासाठी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे सायनाने कोणाच्याही नेतृत्त्वाखाली प्रशिक्षण घेण्यास माझा कधीही विरोध नसेल. त्यामुळे सायनाला मी त्वरित पाठिंबा दिला.”
प्रकाश पदुकोण आणि गोपीचंद अकादमी ह्या भारतात ‘साई’ने मान्यता दिलेल्या अकादमी आहेत. ज्यावेळी सायनाला माझी गरज होती, त्यावेळी मी तिला पुरेपूर मदत केली. त्यामुळे या कालावधीत तिने केलेल्या खेळाचा मला अभिमान असल्याचं विमल कुमार म्हणाले.