दुखापतींनी गेले सहा महिने मला संघर्ष करावा लागला आहे. मात्र आता मी शंभर टक्के तंदुरुस्त आहे. ऑलिम्पिकसाठी तयारी करण्याच्या दृष्टीने मला भरपूर सामन्यांचा सराव करण्याचीच आवश्यकता आहे, असे भारताची अव्वल दर्जाची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने येथे सांगितले.
सायना हिला गेल्या सहा महिन्यांमध्ये हाँगकाँग ओपन, सईद मोदी चषक, दक्षिण आशियाई स्पर्धा, आशियाई अजिंक्यपद स्पर्धा आदी अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धापासून वंचित रहावे लागले होते. ती म्हणाली, आता मी संपूर्णपणे शारीरिक व मानसिक तंदुरुस्त असून ऑलिम्पिकमधील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मी उत्सुक झाले आहे. ऑलिम्पिक स्पर्धा ऑगस्टमध्ये होणार आहे व त्यासाठी फारसा कालावधी राहिलेला नाही. साहजिकच अधिकाधिक सामन्यांचा सराव कसा करता येईल यावर मी लक्ष केंद्रित करीत आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये जागतिक स्पर्धेच्या वेळी मला दुखापत झाली होती. त्यावर मी थोडेसे उपचार केले होते. चीन सुपर सीरिज स्पर्धेच्या वेळी ही दुखापत पुन्हा उफाळून आली. माझ्या कारकीर्दीतील ती खूप मोठी दुखापत होती. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मी स्पर्धात्मक सरावापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. आता दुखापत राहिलेली नाही तरीही ती पुन्हा उद्भवणार नाही यासाठी मी पूरक व्यायाम करीत आहे.
सायनाचे प्रशिक्षक विमलकुमार यांनी सांगितले, तिच्याकरिता नवीन ट्रेनरची नियुक्ती केली आहे. त्याच्या मार्गदर्शनाचा फायदा तिला निश्चितच झाला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये तिने उपचाराबरोबरच हळूहळू सरावही केला आहे. तिच्या तंदुरुस्ती व सरावात खूप प्रगती झाली आहे. तिने तंदुरुस्तीवर खूपच लक्ष दिले आहे. आता फक्त विविध फटके मारताना आवश्यक असणारा आत्मविश्वास तिच्याकडे येण्याची गरज आहे. त्यावर तिने आता लक्ष केंद्रित केले आहे. मे ते जुलै या कालावधीत अधिकाधिक सराव करण्याबाबत मी नियोजन करीत असून त्यानुसार स्पर्धात्मक सराव, पूरक व्यायाम आदी गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल.