गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करणाऱ्या सायना नेहवालला हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सूर सापडला. तिने थायलंडच्या पोर्नतिप बुरानाप्रसर्तसुकवर मात करीत दुसरी फेरी गाठली.

लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाला नुकताच चीन खुल्या स्पर्धेतील पहिल्या फेरीतच पराभव स्वीकारावा लागला. तिने येथे मात्र विजयी सुरुवात केली. तिने पोर्नतिपविरुद्ध १२-२१, २१-१९, २१-१७ असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. दुबई येथील जागतिक सुपर सीरिज अंतिम स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या सायनाला येथे चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे.

पुरुष गटात स्वीस खुल्या विजेत्या भारताच्या एच. एस. प्रणॉयने चीनच्या क्विआओ बिनचे आव्हान २१-१६, २१-१८ असे सरळ दोन गेम्समध्ये संपुष्टात आणले. त्याचा सहकारी समीर वर्मानेही विजयी प्रारंभ केला. त्याने जपानच्या ताकुमा युएदाला २२-२०, २१-१८ असे हरवले.

रिओ ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनू अत्री व बी. सुमेध रेड्डी यांना येथे पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यांना कोरियाच्या सोल्गेयू चोई व कोसुंग हुआन यांनी २१-१५, २१-१८ असे पराभूत केले.