भारताच्या सायना नेहवाल आणि अजय जयराम यांनी मलेशिया मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला व पुरुष दुहेरीत भारतीय खेळाडूंना पराभवाचा धक्का बसला.

लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या सायनाने इंडोनेशियाच्या हॅना रामदिनीवर २१-१७, २१-१२ असा अवघ्या ४२ मिनिटांत विजय मिळवला. अव्वल मानांकित सायनाला पुढील फेरीत आठव्या मानांकित इंडोनेशियाच्या फित्रियानीशी सामना करावा लागणार आहे. पुरुष एकेरी गटात सहाव्या मानांकित जयरामने अटीतटीच्या लढतीत चायनीस तैपेईच्या ह्य़ुसूह ह्य़ुसून यी याचे आव्हान २१-१२, १५-२१, २१-१५ असे परतवले. २९ वर्षीय जयरामला पुढील फेरीत इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुका जिंटिंगविरुद्ध खेळावे लागणार आहे.

दरम्यान, महिला दुहेरीत अपर्णा बालन आणि प्राजक्ता सावंत यांना पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या मानांकित चिआंग काई सीन आणि हूंग शिह हॅन या चायनीस तैपेईच्या जोडीने २१-१८, २१-१४ अशा फरकाने भारतीय जोडीला नमवले. पुरुष दुहेरीत ऑलिम्पिकपटू मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. इंडोनेशियाच्या हेंड्रा अ‍ॅप्रिदा गुनावन आणि मार्किस किडो यांनी तिसऱ्या मानांकित अत्री व रेड्डी जोडीवर २१-१७, १८-२१, २१-१२ असा विजय मिळवला.

मिश्र दुहेरीत सिंगापूरच्या योंग काई टेरी ही आणि वेई हॅन टॅन या जोडीने २१-१७, २१-१७ अशा फरकाने भारताच्या प्राजक्ता सावंत आणि तिचा मलेशियाचा सहकारी योगंद्रन कृष्णन यांच्यावर मात केली. मात्र ज्वाला गट्टा आणि मनू अत्री या नवीन जोडीला सहाव्या मानांकित इंडोनेशियाच्या टोनटोवी अहमद आणि ग्लोरिया इमान्युएल विडजाजा यांचे आव्हान पार करण्यात अपयश आले. इंडोनेशियाच्या जोडीने २१-१८, २१-१० असा विजय मिळवला.