विश्रांतीनंतर परतलेल्या सायना नेहवालने आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सलामी दिली. दुखापतीमुळे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या पी. व्ही. सिंधूने आगेकूच केली, मात्र पारुपल्ली कश्यपला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले.
लंडन ऑलिम्पिक कांस्यपदकविजेत्या सायना नेहवालने व्यस्त वेळापत्रकामुळे सिंगापूर सुपर सीरिजमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. या कालावधीत तंदुरुस्तीवर भर देत सराव केल्याचा प्रत्यय सायनाने या स्पर्धेत दिला. सायनाला या स्पर्धेत दोन फेऱ्यांमध्ये पुढे चाल देण्यात आली होती. तिसऱ्या फेरीच्या लढतीत सायनाने जपानच्या नोझोमी ओखुहारावर २१-१४, १०-२१, २१-१० असा विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये सायनाने ९-५ अशी आघाडी घेतली. ओखुहाराने चार सलग गुणांची कमाई करत प्रतिकार केला. मात्र यानंतर सायनाने सातत्याने गुण मिळवत पहिला गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये ओखुहाराने आक्रमक पवित्रा घेत ५-० अशी सुरुवात केली. नियमितपणे गुण मिळवत ओखुहाराने दुसरा गेम जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सायना ३-५ अशी पिछाडीवर होती. मात्र फटक्यांतली अचूकता वाढवत सायनाने ११-७ अशी आगेकूच केली. या आघाडीचा फायदा उठवत सायनाने सलग नऊ गुण पटकावत तिसऱ्या गेमसह सामनाही जिंकला.
आठव्या मानांकित सिंधूने मकाऊच्या तेंग लोक यु हिला २१-८, २१-९ असे नमवले. चीनच्या झेनमिंग वांगने कश्यपचा २१-२३, २१-१७, २१-८ असा पराभव केला. चीनच्या झिआलोंग लिअू आणि झिहान क्विअू जोडीने मनू अत्री आणि सुमीत रेड्डी जोडीवर २१-१०, २१-१३ अशी मात केली. चीनच्या काई ल्यू आणि याक्विंग ह्य़ुआंग जोडीने अरुण विष्णू आणि अपर्णा बालन जोडीवर २१-१३, २१-५ असा विजय मिळवला.