भारत हा क्रिकेटवेडा देश आहे. क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटपटूंना दैवते मानणाऱ्या या देशात गेल्या काही दिवसांत क्रांती घडली आहे. बॅडमिंटन आणि टेनिस या पूर्णपणे पाश्चिमात्य देशांचे प्रभुत्व असलेल्या खेळांमध्ये भारताचा झेंडा डौलाने फडकवण्याचा पराक्रम दोन रणरागिणींनी दाखवला आहे. सायना नेहवालने एकेरीत तर सानिया मिर्झाने दुहेरीत आपापल्या खेळातील जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान काबीज केले आहे. या निमित्ताने त्यांच्या खडतर प्रवासाचा वेध-

बॅडमिंटन या खेळाचा जन्म पुणे शहरात झाला असला तरी या खेळातही कारकीर्द घडवता येते, हे अनेक वर्षे फारसे कोणाला उमगले नव्हते. प्रकाश पदुकोण व पुल्लेला गोपीचंद यांनी ऑल इंग्लंड स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धाजिंकल्या तरीही या खेळात झोकून देऊन उतरण्याचे धाडस कोणी करू शकत नव्हते. मात्र सायना नेहवालने विजयाची अनेक शिखरे पादाक्रांत करीत या खेळात कारकीर्द घडवता येते, हे दाखवून दिले k03आहे. जागतिक क्रमवारीतील ऐतिहासिक अव्वल स्थान प्राप्त करत तिने आता आपण भारतीय बॅडमिंटनचा चेहरा असल्याचे सिद्ध केले आहे.
कीर्तीच्या शिखरावर पोहोचताना अनेक अडचणी येतात. मात्र अतिशय आत्मविश्वासाने, जिद्दीने व डगमगून न जाता सायनाने हे यश प्राप्त केले आहे. कोणतेही अव्वल यश सहजासहजी मिळत नसते. संयम व चिकाटीला अथक परिश्रमांची जोड देण्याची गरज असते. सायना ही या गुणांबाबत आदर्श खेळाडू मानली जाते. कारकीर्द घडत असताना तिच्या आईवडिलांनी केलेल्या त्यागाची तुलना अन्य कोणत्याही गोष्टीशी करणे अयोग्य होईल. जागतिक स्तरावर कीर्तीचा मुकुट परिधान केला असला तरी सायनाचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. तिच्या पालकांनीही कधीही आपल्या कन्येच्या यशाचे भांडवल केलेले नाही. त्यामुळेच की काय केवळ बॅडमिंटन नव्हे तर अन्य खेळांमध्ये कारकीर्द करू इच्छिणाऱ्या नवोदित खेळाडूदेखील सायनाला आपला आदर्श मानतात. आता जिल्हास्तरावरील स्पर्धामध्ये साधारणपणे ७५० ते ८०० खेळांडूंचा सहभाग असतो, हा सायनाचाच करिष्मा आहे.
बीजिंग येथे ऑलिम्पिकमध्ये सायनाला उपांत्यपूर्व फेरीत निसटता पराभव स्वीकारावा लागला. कनिष्ठ जागतिक स्पर्धेतील विजेतेपदामुळे तिला या स्पर्धेत स्थान मिळाले होते. ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत जरी तिला पराभव पत्करावा लागला, तरीही तिने या फेरीपर्यंत केलेल्या वाटचालीमुळे तिची ओळख सर्वाना झाली. तिची ती पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा होती. या पराभवामुळे तिला खूप काही शिकायला मिळाले. हळूहळू तिच्या खेळात परिपक्वता येऊ लागली. तिने अनेक स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश मिळवले. जागतिक स्तरावर महिला गटात चीनच्या खेळाडूंनी गेली अनेक वर्षे वर्चस्व राखले आहे. असे असले तरी आपण काही कमी नाही, हे सायनाने दाखवून दिले आहे. जागतिक क्रमवारीत चढता क्रम ठेवताना तिला चीनच्या अनेक स्पर्धकांचे आव्हान असते. चीनच्या खेळाडूंना भारताच्या सायना या एकमेव खेळाडूचे आव्हान असते.
विविध स्पर्धामधील अव्वल कामगिरीमुळे लंडन येथील २०१२च्या ऑलिम्पिकमध्ये ती पदकाची प्रबळ दावेदार होती. तरीही २०११चे वर्ष तिच्यासाठी फारसे चांगले गेले नव्हते. शारीरिक तंदुरुस्ती व अव्वल यशासाठी आवश्यक असणाऱ्या फॉर्मबाबत तिला खूप संघर्ष करावा लागला. अर्थात संघर्ष करीत यश मिळवणे, हा तिच्याकडे उपजत गुण असल्यामुळे तिने ऑलिम्पिकसाठी खूप मेहनत घेतली. उपांत्य फेरीत तिला पराभव पत्करावा लागला. मात्र कांस्यपदकाची लढत खेळण्याची संधी तिला मिळाली. या लढतीत तिची प्रतिस्पर्धी वांग झिन हिने पहिली गेम घेतल्यानंतर दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळे सायनाला कांस्यपदक बहाल करण्यात आले. हे पदक सायनाला नशिबाच्या जोरावर मिळाले. तिची क्षमता संपली आहे, अशी टीका तिच्यावर झाली. मात्र या टीकेकडे दुर्लक्ष करीत सायनाने गेल्या तीन वर्षांमध्ये पराक्रमांची मालिका कायम ठेवीत अजूनही आपल्याकडे ऑलिम्पिक पदक मिळवण्याची क्षमता आहे, हे दाखवून दिले आहे. ऑलिम्पिकमध्ये अनुकूल कार्यक्रमपत्रिका मिळवायची असेल तर सतत पहिल्या पाच खेळाडूंमध्ये स्थान टिकविण्याची गरज आहे, हे ओळखून तिने स्पर्धात्मक सराव व तंदुरुस्ती यावर लक्ष केंद्रित केले आहे.
सायनाला गेल्या तीन वर्षांमध्येही अनेक गोष्टींबाबत झगडावे लागले आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये तिला प्रशिक्षक गोपीचंद यांच्यापासून फारकत घ्यावी लागली. तिने विमल कुमार या ज्येष्ठ खेळाडूंकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. त्याकरिता तिला हैदराबादऐवजी बंगळुरू येथे वास्तव्य करावे लागले आहे. घरापासून दूर राहावे लागले तरी रिओ ऑलिम्पिकसाठी हा त्याग तिने केला आहे. विमल कुमार यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केल्यानंतर तिच्या तंदुरुस्तीचा दर्जा उंचावला आहे व जागतिक क्रमवारीत अग्रस्थानही तिने मिळवले आहे.
सहसा सायना कोणत्याही वादात पडत नाही. मात्र पद्म सन्मानाबाबत तिच्या मागणीमुळे थोडेसे वादळ निर्माण झाले होते. आपल्याला पद्म मिळावा अशी तिने मागणी केली नव्हती. तिच्या नावाची शिफारस झाली आहे की नाही याची तिला खात्री करायची होती. त्याला कारणही तसे प्रबळ होते.
कारण गोपीचंद हे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत व सायनाने त्यांच्यापासून फारकत घेतल्यामुळे आपल्या नावाची शिफारस होण्याबाबत तिला साशंकता होती. हा वादंग वगळता सायना ही कधीही वादाच्या भोवऱ्यात सापडलेली नाही. आपण व आपला सराव या पलीकडे तिने कधीही लक्ष दिलेले नाही. त्यामुळेच ती भारतीय बॅडमिंटन क्षेत्राचे मुख्य प्रतीक आहे.