रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि के. श्रीकांत यांनी सहज विजय मिळवत ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या सायनाने मलेशियाच्या जिन वेई गोहचा २१-१२, २१-१४ असा ३७ मिनिटांत पराभव केला. आता उपान्त्यपूर्व फेरीत तिची २०१३च्या विश्वविजेत्या रॅटचानोक इन्टॅनॉनशी पडणार आहे.
पुरुषांच्या एकेरीत श्रीकांतने इंडोनेशियाच्या सोनी द्वि कुनकोरोचा ३४ मिनिटांत २१-१९, २१-१२ अशा फरकाने पराभव केला. जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानावर असलेल्या श्रीकांतची पुढील फेरीत कोरियाच्या क्वांग ही हीओशी सामना होणार आहे.
उपउपांत्यपूर्व फेरीत तन्वी लाड आणि समीर वर्मा यांचे आव्हान संपुष्टात आले. चीनच्या चौथ्या मानांकित वांग यिहानने राष्ट्रीय उपविजेत्या तन्वीचा २१-१८, २१-६ असा पराभव केला. तर इंडोनेशियाच्या अ‍ॅन्थनी सिनीसुका गिंटिंगने समीरला ११-२१, २१-७, २१-१९ असे नामोहरम केले.