भारताची ‘फुल’राणी सायना नेहवालने पुन्हा एकदा बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान काबीज केले आहे. विशेष म्हणजे, कोणताही सामना न खेळता सायना पुन्हा अव्वल स्थान प्राप्त केले. चीनच्या ली शुरेईचे गुरूवारी जागतिक क्रमवारीतील स्थान घसरल्याने सायनाने पुन्हा पहिले स्थान गाठले. मलेशियन ओपन सुपर सीरिजच्या उपांत्य फेरीत सायना नेहवालला ली शूरेईकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे सायानाला आपले अव्वल स्थान गमवावे लागले होते. मात्र शुरेईचे रँकिंग  घसरल्यामुळे सायना पुन्हा एकदा ‘नंबर वन’ बॅडमिंटनपटू बनली आहे.
दरम्यान, पी.व्ही सिंधू मात्र पहिल्या दहा क्रमवारीतून बाहेर झाली असून तिला १२ व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. तर, पुरुष एकेरीत के श्रीकांत तिसऱ्या स्थानावर कायम आहे, तर सिंगापूर ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत धडक मारलेल्या पी कश्यपने १४ वे आणि उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या एच एस प्रणोयने १५वे स्थान गाठले आहे.