भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीला पराभवाचा धक्का दिला आहे. गेल्या ४ वर्षांमध्ये सायनाने यामागुचीला मात देण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. अवघ्या ३६ मिनीटांमध्ये सायनाने यामागुचीला २१-१५, २१-१७ अशी मात देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत सायनाची गाठ जपानच्याच नोझुमी ओकुहाराशी पडणार आहे.

आतापर्यंत यामागुचीने ६ वेळा सायनावर मात केली आहे. २०१४ साली झालेल्या चीन ओपन स्पर्धेत सायनाने यामागुचीवर मात केली होती. यानंतर सायनाचा यामागुचीवरचा हा दुसरा विजय ठरला आहे. सुरुवातीच्या सेटमध्ये सायना ०-४ ने पिछाडीवर पडली होती, मात्र सायनाने जोरदार कमबॅक करत सामन्यात १०-१० अशी बरोबरी साधली. पहिल्या सेटमध्ये मध्यांतरानंतर सायनाने आक्रमक खेळ करत यामागुचीला धक्का दिला. यानंतर दुसऱ्या सेटमध्येही सायनाने यामागुचीच्या तोडीस तोड खेळ करत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.