उपांत्य लढतीत फॅनेट्रीवर दणदणीत विजय
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेत पाच प्रयत्नांनंतर उपांत्यपूर्व फेरीची वेस ओलांडणाऱ्या भारताच्या सायना नेहवालने शनिवारी उपांत्य फेरीत स्थानिक खेळाडू आणि जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या लिंडावेनी फॅनेट्रीला नमवून अंतिम फेरीत धडक मारली. ही ऐतिहासिक भरारी घेणारी सायना पहिली भारतीय खेळाडू आहे. सायनाने अवघ्या ४५ मिनिटांत २१-१७, २१-१७ अशा फरकाने विजय मिळवला. या विजयामुळे सायनाला सुवर्णपदकाचे वेध लागले असून तिच्यासमोर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या आणि गतविजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मरीनचे आव्हान आहे.  कॅरोलिनाने एक तास ३० मिनिटांच्या लढतीत कोरियाच्या सुंग जी हृाुनने झुंजवले. कॅरोलिनाने अटीतटीच्या सामन्यात २१-१७, १५-२१, २१-१६ असा विजय मिळवताना अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.
उपांत्य फेरीच्या या लढतीत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. जबरदस्त फोरहँड आणि बॅकहँडचा नजराणा पेश करताना तिने फॅनेट्रीवर वर्चस्व गाजवले. आत्तापर्यंत एकही महत्त्वाचे जेतेपद नावावर नसलेली फॅनेट्री दुखापतीमुळे संपूर्ण सामन्यात अस्वस्थ दिसत होती, परंतु तिने जिद्दीने सायनाला सडेतोड उत्तर दिले.
पहिल्या गेमपासूनच दोन्ही खेळाडूंमधली चुरस प्रेक्षकांनी अनुभवली. पहिल्या गेममध्ये फॅनेट्रीने ६-२ अशी आघाडी घेतली होती, परंतु गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिला पिछाडीवर टाकले. सायनाने मुसंडी मारताना आघाडी ६-७ अशी कमी केली. त्यानंतर सामना ९-९, १०-१० अशा गुणांवर सुरू होता. सायना आणि फॅनेट्री यांच्यातील दीर्घकाळ चाललेल्या शर्यतीत सायनाने १५-१२ अशी आघाडी घेतली. त्यानंतरही फॅनेट्रीने संघर्ष करत सामना १५-१५ असा बरोबरीत आणला. सायनाने जाळीजवळ खेळ करताना १९-१७ अशी आघाडी घेतली. पुढील दोन्ही गुण सहज कमवत सायनाने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्येही हाच संघर्ष पाहायला मिळाला. ६-६, १०-१०, १४-१४ अशा बरोबरीनंतर सायनाने १७-१४ अशी आघाडी घेतली. दुखापतीने त्रस्त असलेल्या फॅनेट्रीने सघंर्ष चालूच ठेवला आणि पुन्हा सामन्यात १७-१८ अशी मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायनाने सलग तीन गुणांची कमाई करूनही या गेमबरोबर सामनाही आपल्या नावावर केला.

अंतिम फेरीत प्रवेश करीन, असा विचारही केला नव्हता. या आठवडय़ातील ही सर्वात खडतर लढत होती. प्रेक्षकांचे पाठबळ फॅनेट्राला होते. माझ्या चुकीमुळे आणि दबावामुळे  फॅनेट्राला गुण मिळाले. ती कोणत्याही दडपणाविना खेळत होती. तिने दमदार पुनरागमन केले आणि त्यामुळे मी निश्चिंत होऊ शकले नव्हते. अंतिम लढतीतही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल.
सायना नेहवाल</strong>

सायनाने अंतिम फेरीत प्रवेश करून जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेत भारताचे पाचवे पदक निश्चित केले आहे. यापूर्वी पी. व्ही. सिंधूने २०१३ आणि २०१४मध्ये कांस्यपदक जिंकले होते, तर २०११मध्ये ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांनीही महिला दुहेरीत कांस्यपदक पटकावले होते. तत्पूर्वी, १९८३मध्ये दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोन यांनी कांस्यपदकाची कमाई करून भारतासाठी स्पध्रेतील पहिले पदक जिंकले होते.