ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा पराभूत

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सायना नेहवालला डेन्मार्क सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत विजयासाठी जोरदार संघर्ष करावा लागला. अन्य लढतींमध्ये मनू अत्री-सुमीत रेड्डी जोडीने विजयी सलामी दिली, मात्र अनुभवी ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले.

२०१२मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावलेल्या सायनाने थायलंडच्या ब्युसानन ओंगबुमरुनगफानवर विजय मिळवला होता. मात्र बुधवारी झालेल्या लढतीत ब्युसाननने सायनाला टक्कर दिली. सायनाने ही लढत २३-२१, १४-२१, २१-१८ अशी मात केली. दुसऱ्या फेरीत सायनाचा मुकाबला थायलंडच्याच पॉर्नटिप ब्युरानप्रार्स्टुकशी होणार आहे.

पहिल्या गेममध्ये सायना ८-४ अशी आघाडीवर होती. सायनाने जिद्दीने खेळ करत ९-९ अशी बरोबरी केली. ब्युसाननने आक्रमक खेळ करत २०-१८ अशी सरशी साधली. मात्र यानंतर सायनाने लौकिकाला साजेसा खेळ करत बाजी मारली.
दुसऱ्या गेममध्ये ब्युसानन ७-४ अशी आघाडीवर होती. ९-९ अशा बरोबरीनंतर ब्युसानने सातत्याने गुण मिळवत दुसरा गेम नावावर केला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सायनाने ६-२ अशी आघाडी मिळवली मात्र ब्युसाननने ६-६ अशी बरोबरी केली. ११-११ अशा बरोबरीनंतर सायनाने तडाखेबंद खेळ करत तिसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.

पुरुष दुहेरीत मनू-सुमीत जोडीने इंग्लंडच्या मार्कुस एलिस आणि ख्रिस लँग्रिज जोडीवर २४-२२, २१-१३ असा विजय मिळवला. जपानच्या रेइका काकिवा आणि मियुकी मेइडा जोडीने ज्वाला-अश्विनी जोडीला २१-१९, २१-१८ असे नमवले.