इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे तीनवेळा जेतेपद पटकावणाऱ्या सायना नेहवालला यंदा मात्र उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. अव्वल मानांकित चीनच्या ली झेरुईने सायनावर २२-२०, २१-१५ अशी सरळ गेम्समध्ये मात केली. सायनाच्या पराभवासह स्पर्धेतील भारताचे आव्हानही संपुष्टात आले आहे. उबेर चषकाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे सायनाने जपान सुपर सीरिज स्पर्धेतून माघार घेतली.
विश्रांतीनंतर नव्या ऊर्जेसह तिने इंडोनेशिया स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. दोन फेऱ्या आत्मविश्वासाने पार करणाऱ्या सायनाला उपांत्यपूर्व फेरीत मात्र लि झेरुईविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या गेममध्ये जोरदार मुकाबला रंगला. मात्र लीने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये मात्र लीच्या जोरदार आक्रमणासमोर सायना निष्प्रभ ठरली.
क्रमवारीतही घसरण
जपान सुपरसीरिज स्पर्धेतून माघार घेण्याच्या निर्णयाचा सायनाच्या क्रमवारीतील स्थानावर परिणाम झाला आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाने जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार सायनाची क्रमवारीत नवव्या स्थानी घसरण झाली आहे. युवा पी.व्ही.सिंधू दहाव्या स्थानी आहे. पारुपल्ली कश्यपने क्रमवारीत दोन स्थानांनी सुधारणा करत अठराव्या स्थानी झेप घेतली आहे.