भारताची बॅडमिंटन चॅम्पियन सायना नेहवाल हिने शुक्रवारी आपला २७ वा वाढदिवस साजरा केला. भारताची ‘फुलराणी’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या सायना वाढदिवस बॅडमिंटन कोर्टवरच साजरा करण्यात आला. सायनाने केक कापतानाचे आणि बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो आपल्या ट्विटर हॅण्डलवर अपलोड केले आहेत. याशिवाय, केक कापतानाचा व्हिडिओ देखील ट्विट केला आहे.

सायनासोबत तिची आई आणि प्रशिक्षक विमल कुमार उपस्थित होते. सायनाच्या आईने तिला केक देऊन वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले, तर सायनानेही तिला दिलेल्या सरप्राईजबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. सायनावर आज संपूर्ण जगभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॅडमिंटनमध्ये सायनाने भारताची मान उंचावली. बॅडमिंटन खेळाला देशात लोकप्रियता मिळवून देण्यात सायना खूप मोठा वाटा आहे. वयाच्या १६ व्या वर्षी तिने जागतिक क्रमवारीतील चौथ्या मानांकित खेळाडूचा पराभव केला होता. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. लंडन ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्य पदकाची कमाई करून देत सायना सर्वांची वाहवा मिळवली. तर सुपर सिरिजचे जेतेपद, कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक अशी दमदार कामगिरीची नोंद सायनाच्या नावावर केली गेली.

वाचा: हॅप्पी बर्थ डे सायना…जाणून घ्या ‘फुलराणी’च्या काही खास गोष्टी

२००९ सालापासून ती बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय कमवारीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये कायम होती. त्यानंतर २०१५ साली तिने क्रमवारीत अव्वल स्थान देखील गाठले होते. क्रमवारीत नंबर एकचे स्थान प्राप्त करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. सायना नुकतेच ऑल इंग्लंड चॅम्पियनशीपमध्ये खेळताना दिसली. स्पर्धेत सायना उपांत्यपूर्व फेरीतच बाद झाली.