प्रसन्न सकाळी पतंग उडवण्याची धमाल सुरू व्हावी. तोडीस तोड दोस्तांच्या संगतीत काटाकाटीला सुरुवात व्हावी, चुरस वाढत जावी आणि तेवढय़ात आघाडीवर असणाऱ्या भिडूचा मांजा तुटावा, आकाशातही वाऱ्याची खप्पामर्जी व्हावी आणि सगळ्या उत्साहावर विरजण पडावे. भारतीय बॅडमिंटन विश्वाची यंदाची कहाणी अगदी अशीच आहे. संस्मरणीय यशदायी २०१४ वर्षांनंतर भारतीय बॅडमिंटनपटूंकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. या अपेक्षांना न्याय देत त्यांनी सुरुवातही दणक्यात केली. मात्र हळूहळू प्रत्येकाला दुखापतींनी ग्रासले. त्यात भर पडली ढासळणाऱ्या फॉर्मची. त्यामुळे त्यांची लयच बिघडली. दुखापतींना टक्कर देत सायनाने मिळवलेले यश यंदाच्या वर्षांचे फलित आहे. सायना आणि अन्य बॅडमिंटनपटू यांच्यात असणारी तफावत यंदा आणखी रुंदावली. वर्षअखेरीस झालेल्या प्रीमिअर बॅडमिंटन लीगच्या घोषणेने समस्त बॅडमिंटन विश्वाला हुरूप आला आहे.
सायनाची अव्वल भरारी
लखनौ येथे झालेल्या सय्यद मोदी ग्रां.प्रि. स्पर्धेचे जेतेपद पटकावत सायनाने दणक्यात सुरुवात केली. सातत्याने जेतेपदाची हुलकावणी देणाऱ्या इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदाची कमाई करत सायनाने शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. या स्पर्धेत कॅरोलिन मारिनसारख्या तुल्यबळ खेळाडूला नमवल्यानंतर सायनाचे जागतिक क्रमवारीतले अव्वल स्थान पक्के झाले. राजाश्रय आणि लोकाश्रय लाभलेल्या क्रिकेटवेडय़ा देशात बॅडमिंटनसारखा शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारा आणि महागडा खेळ खेळण्याचा निर्णयच धाडसी आहे. अथक मेहनत आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांचा पाठिंबा याच्या जोरावर सायनाने खेळायला सुरुवात केल्यापासून १५ वर्षांत जगातली सर्वोत्तम बॅडमिंटनपटू होण्याचा मान मिळवला. क्रमवारीतील अव्वल स्थानासह ऑलिम्पिक कांस्यपदक, सुपर सीरिज स्पर्धाची असंख्य जेतेपदे आणि राष्ट्रीय जेतेपदे नावावर असणाऱ्या सायनाच्या कारकीर्दीचे एक वर्तुळ पूर्ण झाले. या ऐतिहासिक यशाने आत्मविश्वास उंचावलेल्या सायनाने ऑल इंग्लंड, जागतिक अजिंक्यपद आणि चीन सुपर सीरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या तिन्ही स्पर्धामध्ये जेतेपदाने सायनाला हुलकावणी दिली. मात्र ज्या स्पर्धेसाठी पात्र होणेही दुरापास्त असणाऱ्या स्पर्धेत सायनाने मातब्बर खेळाडूंना नमवत अंतिम फेरीपर्यंत मारलेली मजल प्रशंसनीय आहे, पण पायाच्या घोटय़ाला झालेल्या दुखापतीने सायनाची लय हरपली, मात्र तरीही वर्षअखेरीस होणाऱ्या प्रतिष्ठेच्या सुपर सीरिज फायनल्स स्पर्धेत सायनाने विश्वविजेत्या कॅरोलिन मारिनला चीतपट करत सनसनाटी विजयाची नोंद केली; परंतु दुखापतींनी त्रास दिल्यामुळे जेतेपदापासून तिला दूरच राहावे लागले. क्रिकेटेतर खेळांमध्ये कमी वयात उत्तुंग यश मिळवणाऱ्या सायनाच्या कारकीर्दीवर आधारित चित्रपटाची घोषणा तिच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का ठरली. यंदाच्या वर्षांत समाजमाध्यमांवर सक्रिय झालेल्या सायनाने याच व्यासपीठाद्वारे पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड न झाल्याची खंत व्यक्त केली. सायनाची खंत चर्चेचा विषय ठरली आणि संबंधित विभागाने दखल घेत पुरस्कारासाठी सायनाचे नाव सुचवले, पण निर्धारित वेळ उलटून गेल्याने सायनाला हा पुरस्कार मिळालाच नाही.

उतरती कळा..
पी.व्ही. सिंधूसाठी हे वर्ष नकोसेच ठरले. डाव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने सिंधूला प्रदीर्घ काळ कोर्टपासून दूर राहावे लागले. दुखापतीतून सावरल्यानंतर सिंधूने अडखळत पुनरागमन केले. लाडक्या इंडोनेशियन स्पर्धेत जेतेपदाची नोंदवलेली हॅट्ट्कि यंदाच्या वर्षांतला सिंधूसाठी आनंदाचा एकमेव क्षण ठरला. या यशानंतर पुन्हा सिंधूचा िंजंकण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला. ऑलिम्पिकपूर्व वर्षांत दमदार कामगिरी करत क्रीडाविश्वातील सर्वोच्च स्पर्धेसाठी सज्ज होण्यासाठी क्रीडापटू उत्सुक असतात. मात्र दुखापतीने वेढल्यामुळे सिंधूसाठी हे वर्ष निराशाजनकच ठरले.
श्रीकांतने गेल्या वर्षीचा झंझावाती फॉर्म कायम राखत स्विस तसेच इंडिया खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. सातत्यपूर्ण प्रदर्शनाच्या बळावर श्रीकांतने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. मात्र यानंतर श्रीकांतच्या कामगिरीत घसरणच पाहायला मिळाली. गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या पारुपल्ली कश्यपने सय्यद मोदी ग्रां.प्रि. स्पर्धेचे जेतेपद पटकावत दिमाखात सुरुवात केली. मात्र पोटरीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे कश्यपचा मार्गच खुंटला.
प्रदीर्घ काळ खांद्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या अजय जयरामने डच ग्रां.प्रि. स्पर्धेचे जेतेपद कायम राखत कारकीर्दीतील देदीप्यमान क्षण साकारला. सातत्याने कामगिरीत सुधारणा करणाऱ्या एच.एस. प्रणॉयला यंदाच्या वर्षांत एकही जेतेपद पटकावता आले नाही. मात्र जॅन ओ जॉर्गेनसन आणि लिन डॅन या मातब्बर खेळाडूंवर त्याने मिळवलेले विजय बॅडमिंटन विश्वात चर्चेचा विषय ठरले. साईप्रणीतने यंदाच्या वर्षांत चार स्पर्धाची जेतेपदे पटकावली. सिरील वर्माने जागतिक कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. समीर वर्माने भाऊ सौरभ वर्माला नमवत टाटा खुल्या स्पर्धेत जेतेपद नावावर केले. हर्षील दाणीने तुर्की येथील स्पर्धेत रौप्यपदक मिळवले.

दुहेरीत आशा
मनू अत्री आणि सुमीत रेड्डी यांच्या रूपात भारताला दुहेरीत नवे आशास्थान निर्माण झाले. या जोडीने मेक्सिको स्पर्धेच्या जेतेपदासह कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या ग्रां.प्रि. जेतेपदाची कमाई केली. या जोडीने या वर्षी बेल्जियम आणि नायजेरिया स्पर्धाच्या जेतेपदावर कब्जा केला होता. या जोडीने चार स्पर्धामध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारत आपल्या कौशल्याची प्रचीती दिली. ज्वाला गट्टा आणि अश्विनी जोडीने यंदाच्या वर्षांत कॅनडा स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. लक्ष्य ऑलिम्पिक योजनेत समावेशासाठी त्यांनी दिलेल्या लढय़ाला यश आले.

लीगला उजाळा
आर्थिक डोलारा कोसळल्यामुळे इंडियन बॅडमिंटन लीग उपक्रम पहिल्या प्रयत्नानंतरच बारगळला. खासगी माध्यमातून स्पर्धा आयोजनाचा सावळा गोंधळ झाल्याने भारतीय बॅडमिंटन लीगने स्वत:च हे शिवधनुष्य पेलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ऑलिम्पिक वर्षांत घाईघाईने आयोजित या लीगला बहुतांशी आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी बगल दिली आहे. भारतीय बॅडमिंटनपटूंना घरच्या मैदानावर, चाहत्यांच्या पाठिंब्यात खेळण्याची आणि त्याद्वारे धनाढय़ होण्याची सुवर्णसंधी आहे.

– पराग फाटक
parag.phatak@expressindia.com