श्रीकांतचेही आव्हान संपुष्टात; समीरची दुसऱ्या फेरीत आगेकूच

ऑडेन्से (डेन्मार्क) : आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धामध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालची अपयशाची मालिका सुरूच आहे. बुधवारी डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत तिचे आव्हान संपुष्टात आले. पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतलाही सलामीलाच पराभवाला सोमोरे जावे लागले, तर समीर वर्माने मात्र दुसरी फेरी गाठली आहे.

महिला एकेरीत जपानच्या सायाका ताकाहाशीने जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावरील सायनाचा २१-१५, २३-२१ असा ३७ मिनिटांत पराभव केला. २९ वर्षीय सायनाने या स्पर्धेत गतवर्षी उपविजेतेपद पटकावले होते.

जानेवारी महिन्यात इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या सायनाला त्यानंतर तंदुरुस्तीमुळे कारकीर्दीच्या खडतर टप्प्यातून जावे लागत आहे. चीन आणि कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धाच्या पहिल्याच फेरीत तिला गाशा गुंडाळावा लागला होता. ऑगस्टमध्ये झालेल्या थायलंड खुल्या स्पर्धेतही जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावरील ताकाहाशीने सायनाला हरवले होते.

पुरुष एकेरीत समीरने पहिल्या फेरीचा अडथळा ओलांडला. त्याने जपानच्या कांटा सुनीयामाला २१-११, २१-११ असे २९ मिनिटांच्या लढतीत नामोहरम केले.

मिश्र दुहेरीत प्रणव चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी जर्मनीच्या माव्‍‌र्हिन सिडेल आणि लिंडा ईफ्लेर जोडीचा २१-१६, २१-११ असा पराभव केला. परंतु सात्त्विकसाईराज रनकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनी माघार घेतल्यामुळे वांग यि ल्यू आणि ह्युआंग डाँग पिंग या चीनच्या जोडीला पुढे चाल देण्यात आली.

२६ वर्षीय श्रीकांतला डेन्मार्कच्या आंद्रेस अ‍ॅन्टोसेनने २१-१४, २१-१८ अशी धूळ चारली. हा सामना फक्त ४८ मिनिटे रंगला. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या श्रीकांतला यावर्षी इंडिया खुल्या स्पर्धेत मिळवलेल्या उपविजेतेपदाव्यतिरिक्त एकाही स्पर्धेची किमान उपांत्य फेरीसुद्धा गाठता आलेली नाही. त्यामुळे पुढील आठवडय़ात रंगणाऱ्या फ्रेंच खुल्या स्पर्धेत तरी तो कामगिरीत सुधारणा करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.