फ्रेंच ओपन सुपर सीरिज बॅडमिंटनमध्ये मला अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला असला, तरी प्रशिक्षक बदलल्यानंतर माझ्या कामगिरीत सुधारणा झाली आहे, असे भारताची आघाडीची खेळाडू सायना नेहवालने सांगितले.
सायनाला या स्पध्रेमधील उपांत्यपूर्व फेरीत शियान वाँग हिच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. या पराभवाबद्दल आश्चर्य व्यक्त करीत सायना म्हणाली, ‘‘हा पराभव माझ्यासाठी अनपेक्षित आहे. काही अक्षम्य चुकांमुळे मला हा सामना गमवावा लागला. १४-८ अशी आघाडी असतानाही मी हा सामना गमावला. सहसा अशी भक्कम आघाडी असताना मी सामना गमावलेला नाही. तरीही परतीच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवू न शकल्यामुळे माझा पराभव झाला. मी त्या वेळी थोडीशी विश्रांती घेतली असती तर या चुका टाळता आल्या असत्या. काही वेळा खूप मानसिक दडपणाखाली अशा चुका होतात. या चुकांपासून बोध घेऊन मी आगामी स्पध्रेत निश्चित चांगली कामगिरी करीन.’’
जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेली सायना म्हणाली, ‘‘हा सामना मी गमावला असला, तरी माझ्या कामगिरीबाबत व सध्याच्या ‘फॉर्म’बाबत मी समाधानी आहे.
सप्टेंबरपासून मी विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला चांगला सूर सापडला आहे. माझ्या खेळात सातत्य आले आहे. अव्वल स्थानासाठी सतत चीनच्या खेळाडूंना सामोरे जाणारी मी एकमेव भारतीय खेळाडू आहे याचा मला खूप आनंद होत आहे. प्रशिक्षकांमध्ये बदल करणे ही काही दीर्घकालीन किंवा अल्पकालीन योजना नाही. खेळात सुधारणा करण्यासाठी अशा गोष्टी आवश्यक असतात.’’
ती पुढे म्हणाली, ‘‘पुल्लेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली मी दहा वर्षे खेळत होते. माझ्या खेळात आणखी सुधारणा आवश्यक आहे असे वाटल्यानंतर मी प्रशिक्षक बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माझ्या खेळात प्रगती होत आहे. लवकरच विजेतेपदाच्या मार्गावर मी पोहोचेन अशी मला खात्री आहे. प्रशिक्षक बदलल्यानंतर पहिल्या विजेतेपदासाठी मी कमालीची उत्सुक आहे.’’