पी.व्ही.सिंधू, किदम्बी श्रीकांत यांच्यासह अजय जयराम, एच.एस. प्रणॉय जेतेपदासाठी शर्यतीत

दिल्लीत घरच्या मैदानावर जेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतर आता भारतीय बॅडमिंटनपटू मलेशिया सुपर सीरिज स्पर्धेच्या आव्हानासाठी सज्ज झाले आहेत. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी मे महिन्यापर्यंतचा कालावधी आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान कायम राखण्यासाठी भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालसह पी.व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत कामगिरीत सातत्य राखण्यासाठी आतुर आहेत.
इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत मोक्याच्या क्षणी खेळ उंचावता न आल्याने भारतीय बॅडिमटनपटूंना पराभवाला सामोरे जावे लागले होते. या स्वरूपाच्या चुकांतून शिकत मलेशिया सुपर सीरिज स्पर्धेत दमदार कामगिरी करण्यासाठी भारतीय बॅडमिंटनपटू आतुर आहेत. यंदाच्या वर्षांत दुखापतींनी वेढल्यामुळे सायना नेहवालने बहुतांशी स्पर्धामधून माघार घेतली होती. दुखापतीतून सावरल्यानंतर सायना इंडिया खुल्या स्पर्धेत सहभागी झाली. मात्र उपांत्य फेरीत चीनच्या ली झेरूईचे आव्हान तिला पेलता आले नाही. कारकीर्दीत चीनच्या खेळाडूंनी सायनाला नेहमीच टक्कर दिली आहे. ऑलिम्पिक पदक मिळवणाऱ्या सायनाला मलेशिया स्पर्धेत या चुका टाळण्याची संधी आहे. सलामीच्या लढतीत सायनासमोर थायलंडच्या निचॉन जिंदापॉलचे आव्हान असणार आहे. जिंदापॉलविरुद्धच्या पाचही लढतींत सायनाने निर्भेळ यश मिळवले आहे. या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी सायना प्रयत्नशील आहे.
‘‘मी माझ्या खेळाचे चांगले विश्लेषण करते आहे; परंतु दुखापतीमुळे जास्त सामने खेळण्याची संधी मिळत नव्हती. दुखापतीतून सावरल्यानंतर बलाढय़ प्रतिस्पध्र्याशी खेळणे अवघड असते. मलेशिया स्पर्धेद्वारे जास्तीत जास्त सामने खेळण्याचा सराव मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे,’’ असे सायनाने सांगितले.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची दोन पदके नावावर असणाऱ्या पी.व्ही. सिंधूला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये सात विविध खेळाडूंविरुद्ध तिला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मलेशिया स्पर्धेत सिंधूचा मुकाबला चीनच्या हे बिंगजिओशी होणार आहे.
गेल्या वर्षी इंडिया खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाची कमाई केल्यानंतर श्रीकांतला सुपर सीरिज स्पर्धेत दुसऱ्या फेरीचा अडथळा पार करता आलेला नाही. इंडिया खुल्या स्पर्धेत सलामीच्या लढतीत झालेल्या पराभवामुळे जागतिक क्रमवारीतील त्याच्या स्थानावर परिणाम होणार आहे. सलामीच्या लढतीत श्रीकांतची लढत बुनसाक पोनसन्नाशी होणार आहे. बुनसाकविरुद्ध श्रीकांतची कामगिरी ३-१ अशी आहे. क्रमवारीचे जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी अजय जयराम, एच.एस. प्रणॉय यांच्यात चुरस आहे. जयरामचा सामना हाँगकाँगच्या ह्य़ू युनशी, तर प्रणॉयची लढत जपानच्या केंटो मोमोटाशी होणार आहे.
दुहेरी प्रकारात मनू अत्री आणि सुमीत रेड्डी जोडीचा मुकाबला रशियाच्या व्लादिमीर इव्हानोव्ह आणि इव्हान सोझोनोव्ह जोडीशी होणार आहे. प्रणव चोप्रा आणि अक्षय देवलकर जोडीसमोर चीनच्या फू हैफेंग आणि झांग नान जोडीचे आव्हान असणार आहे.