भारताच्या सायना नेहवालने हंगामाची दमदार सुरुवात करताना इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत तिने जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या रॅटचानोक इंथानोनवर सरळ गेममध्ये विजय मिळवला. इंडोनेशियात तीन जेतेपद नावावर करणाऱ्या सायनाने ४८ मिनिटांच्या खेळात इंथानोनचा २१-१९, २१-१९ असा पराभव केला.

या विजयाबरोबर सायनाने इंथानोनविरुद्धच्या जय-पराजयाच्या आकडेवारीत ९-५ अशी वाढ केली आहे. पहिल्या गेममध्ये सायनाने संघर्षमय खेळ करताना ६-१० अशा पिछाडीवरून मुसंडी मारली. दुसऱ्या गेममध्ये सायनाने थायलंडच्या खेळाडूला अधिक संधी दिली नाही. जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर असलेल्या सायनाने गतवर्षी मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते आणि जवळपास वर्षभरानंतर तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सायनाला अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू आणि अव्वल मानांकित तैपेईच्या ताय त्झू यिंग हिच्याशी सामना करावा लागणार आहे. यिंगने उपांत्य फेरीत आठव्या मानांकित चिनी खेळाडू हे बिंगजीओवर १९-२१, २१-१५, २१-१५ असा संघर्षमय विजय मिळवला. यिंगची सायनाविरुद्धची जयपराजयाची आकडेवारी ८-५ अशी आहे आणि मागील सहा सामन्यांत यिंगने सायनाला पराभूत केले आहे. २०१३च्या स्वीस खुल्या स्पर्धेत सायनाने अखेरचे यिंगला नमवले होते. पुरुष दुहेरीत सात्त्विक साईराज रनकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय युवा खेळाडूंचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. अव्वल मानांकित इंडोनेशियाच्या मार्कस फेर्नाल्डी गिडीओन आणि केव्हिन संजया सुकामुल्जो या जोडीने भारतीय खेळाडूंवर २१-१४, २१-११ असा विजय मिळवला.