लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकावर नाव कोरत सायना नेहवालने समस्त देश वासियांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली होती. या ऐतिहासिक यशातून प्रेरणा घेत सायना आणखी जेतेपदांची कमाई करेल अशी तिच्या चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र ढासळता फॉर्म आणि तंदुरुस्तीच्या समस्यांमुळे यंदाच्या वर्षांत सुपर सीरिज दर्जाच्या स्पर्धाच्या जेतेपदाने सायनाला हुलकावणी दिली आहे.
नुकत्याच झालेल्या थायलंड आणि इंडोनेशियन सुपर सीरिज स्पर्धेत गतविजेत्या सायनाला जेतेपद राखता आले नाही. क्रमवारीत तुलनेने बऱ्याच मागे असलेल्या खेळाडूंकडून तिला पराभव स्वीकारावा लागला. त्या पाश्र्वभूमीवर जेतेपदांचा दुष्काळ थांबवण्याची संधी सिंगापूर सुपर सीरिज स्पर्धेद्वारे सायनाला मिळणार आहे.
अखिल इंग्लंड आणि स्विस स्पर्धेत सायनाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. थायलंड स्पर्धेत उपांत्यपूर्व तर इंडोनेशियन स्पर्धेत उपांत्य फेरीत तिला गाशा गुंडाळावा लागला होता. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या सायनाला गेल्या वर्षी ऑक्टोबरनंतर कोणत्याही स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. तिच्यासाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी हिरमोड करणारी ही गोष्ट आहे. पराभवाने येणारी निराशा झटकत पुन्हा प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरण्याची सायनाला संधी आहे.   
गेल्या वर्षी लंडन ऑलिम्पिकच्या तयारीमुळे सायना या स्पर्धेत सहभागी झाली नव्हती. यंदा तिची सलामीची लढत सिंगापूरच्या ज्युआन गुशी होणार आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या थायलंड खुल्या स्पर्धेत ज्युआननेच सायनाला उपांत्यपूर्व फेरीत नमवले होते. या पराभवाची परतफेड करण्याची द्वितीय मानांकित सायनाला संधी आहे.
मात्र जेतेपदापर्यंतचा प्रवास सायनासाठी सोपा असणार नाही. जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडूंमध्ये असलेल्या इरिको हिरोसे आणि रत्नाचोक इन्थॅनॉन या खेळाडूंमुळे सायनासमोरचे आव्हान खडतर झाले आहे. मात्र उपांत्य फेरीपर्यंत सायनाला चीनच्या एकाही खेळाडूचा सामना करावा लागणार नाही.
अन्य खेळाडमूंमध्ये जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या पी. व्ही. सिंधूने गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे. पुरुष गटात जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानी असलेल्या पारुपल्ली कश्यपची सलामीची लढत जपानच्या शो सासाकीशी होणार आहे.
दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या लिन डॅनने माघार घेतल्यामुळे कदंबी श्रीकांतला मुख्य फेरीत थेट प्रवेश देण्यात आला आहे.
२० वर्षीय श्रीकांतने नुकत्याच झालेल्या थायलंड खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. श्रीकांतची सलामीची लढत व्हिएतनामच्या तिअन मिन्हशी होणार आहे.
अन्य लढतींमध्ये आनंद पवारची लढत चौथ्या मानांकित जपानच्या केनिची टागोशी होणार आहे. सौरभ वर्मासमोर हाँगकाँगच्या विंग कि वांगचे आव्हान आहे. गुरुसाईदत्तचा मुकाबला मलेशियाच्या वेई फेंग चोंगशी होणार आहे.
महिला दुहेरीत अपर्णा बालन आणि सिक्की रेडीची लढत मलेशियाच्या मेंग यीन ली आणि यिन लू लिम जोडीशी होणार आहे. अश्विनी पोनप्पा आणि प्रज्ञा गद्रे जोडीचा मुकाबला इंडोनेशियाच्या नित्या क्रिशिंदा महेश्वरी आणि ग्रेशिया पोली जोडीविरुद्ध असणार आहे.
मिश्र दुहेरीत अश्विनी आणि तरुण कोना जोडीचा सामना टॉनटोवी अहमद आणि लिलियाना नटसिर जोडीशी होणार आहे.