महिला दिनाचे औचित्य साधत ‘ऑल इंग्लंड बॅडमिंटन’ या बॅडमिंटन विश्वातल्या सगळ्यात प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरण्याची भारताची फुलराणी सायना नेहवालला संधी होती. मात्र अफाट ऊर्जा, अचूक तसेच जोरकस फटके आणि डावखुऱ्या शैलीच्या जोरावर स्पेनच्या कॅरोलिन मारिनने सायनाचे जेतेपदाचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. विशेष म्हणजे या दोघींमध्ये आधी झालेल्या तिन्ही लढतींत सायनाने निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. मात्र इतिहास, आकडेवारी, मानांकन या सगळ्यांना बाजूला सारत डावखुऱ्या कॅरोलिनने ऐतिहासिक जेतेपदाची कमाई केली. तिने ही लढत १६-२१, २१-१४, २१-७ अशी जिंकली.
लंडन ऑलिम्पिकनंतर खराब फॉर्म आणि दुखापती यांच्यामुळे सायनाच्या कामगिरीत घसरण झाली होती. गुरू गोपीचंद यांच्याऐवजी विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याच्या निर्णयावर टीका झाली. मात्र यशोशिखर गाठण्यासाठी रुळलेली वाट सोडण्याचे धाडस करावे लागते हे सिद्ध करत सायनाने चीनच्या खेळाडूंचा अडथळा पार करत अंतिम फेरी गाठली. मात्र अंतिम लढतीचा दबाव ती झेलू शकली नाही. k02
बॅडमिंटन विश्वातल्या सगळ्यात अवघड समजल्या जाणाऱ्या ऑल इंग्लंड स्पर्धेचे जेतेपद आतापर्यंत केवळ प्रकाश पदुकोण आणि सायनाचे आद्य गुरू पुल्लेला गोपीचंद यांनाच पटकावता आले आहे. या दिग्गजांच्या मांदियाळीत स्थान पटकावण्याची सायनाला दुर्मीळ संधी होती. मात्र कॅरोलिनच्या झंझावाती खेळासमोर सायना निष्प्रभ ठरली.
पहिल्या गेममध्ये २-२ अशा बरोबरीनंतर सायनाने जोरदार स्मॅशेसच्या बळावर आगेकूच केली. कॅरोलिनच्या हातून होणाऱ्या चुकांचा योग्य वेळी फायदा घेत सायनाने ११-६ अशी भक्कम आघाडी घेतली. नेटजवळून सुरेख खेळ करत आणि बरोबरीने बॉडीलाइन स्मॅशेसचा आधार घेत सायनाने आघाडी १५-८ अशी वाढवली. सातत्याने चांगला खेळ करत सायनाने २०-१० अशा स्थिती गाठली. मॅचपॉइंट मिळवणाऱ्या सायनाला कॅरोलिनने चांगलेच तंगवले आणि सलग सहा गुण मिळवले. अखेर कॅरोलिनच्या हातून झालेल्या चुकीचा फायदा उठवत सायनाने पहिला गेम जिंकला.
पहिल्या गेममध्ये दडपणाखाली खेळणाऱ्या कॅरोलिनने दुसऱ्या गेममध्ये संतुलित आणि भेदक फटक्यांसह खेळ करत सायनाला नामोहरम केले. ११-११ अशा बरोबरीनंतर कॅरोलिनने बॉडीलाइन आणि क्रॉसकोर्ट स्मॅश आणि नेटजवळच्या अचूक खेळाच्या जोरावर १७-१३ अशी आघाडी घेतली. सायनाला पुनरागमनाची कोणतीही संधी न देता कॅरोलिनने आणखी चार गुण मिळवत दुसरा गेम जिंकला.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये कॅरोलिनने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्वीकारत ८-४ अशी आघाडी मिळवली. एकीकडे कॅरोलिनच्या फटक्यातले वैविध्य आणि अचूकता वाढत असताना सायनाच्या फटक्यांतला स्वैरपणा वाढला. कॅरोलिनने तडाखेबंद खेळाच्या जोरावर १६-५ अशी भक्कम स्थिती गाठली. सायनाने दोन गुण मिळवले. मात्र यानंतर कॅरोलिनच्या दृढनिश्चयासमोर ती सपशेल अपयशी ठरली. डाव्या हाताने खेळणाऱ्या कॅरोलिनने उजव्या हाताने खेळणाऱ्या सायनाला शैलीदार कोनाच्या आधारे पहिल्या गेमची पिछाडी भरून काढत थरारक विजय मिळवला. याआधी सायना दोनदा  या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत झाली होती.