मिश्र दुहेरी गटात मनू-अश्विनी जोडी पराभूत

भारताच्या सायना नेहवालने नऊ लाख अमेरिकन डॉलर पारितोषिक रकमेच्या इंडोनेशिया सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पध्रेला शानदार प्रारंभ करताना चायनीज तैपेईच्या पै यू पो हिचा पराभव केला.

या स्पध्रेत तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या आठव्या मानांकित सायनाला हा विजय मिळवण्यासाठी झगडावे लागले. सायनाने जागतिक क्रमवारीत २३व्या स्थानावर असलेल्या पै यू पो हिचा २१-११, १९-२१, २१-१५ असा पराभव केला. इस्टोरा गेलोरा बंग कर्नो स्टेडियमवर एक तास तीन मिनिटे ही लढत चालली. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या सायनाची पुढील फेरीत इंडोनेशियाच्या फित्रियानी फित्रियानीशी गाठ पडणार आहे.

याचप्रमाणे मिश्र दुहेरीत भारताच्या मनू अत्री आणि अश्विनी पोनप्पा यांनी शर्थीने लढत देऊनही पदरी पराभव पडला. सिंगापूरच्या याँग कई टेरी ही आणि वेई हान टॅन जोडीने अर्धा तास रंगलेल्या सामन्यात मनू-अश्विनीला २१-१४, २७-२५ असे पराभूत केले.

यंदाच्या हंगामातील विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक असलेल्या सायनाने सुरुवात आक्रमकपणे करीत गुण घेतले. पै हिनेही तिला चांगली लढत देत १४-११ पर्यंत फरक उंचावला. मात्र सायनाने सात सरळ गुण घेत पहिला गेम  जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सायनाने प्रारंभी १०-५ अशी आघाडी घेतली. मग पै हिने ७ गुण घेत १२-१० अशी आघाडी घेतली. मग सायनाने हा गेम वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला.

निर्णायक गेममध्ये सायनाने सुरुवातीला ११-५ अशी आघाडी घेतली. परंतु पै हिने शिताफीने सामना करीत १३-१३ अशी बरोबरी साधली. मग पाच सलग गुण घेत सायनाने १८-१३ अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर तिसऱ्या गेमसह सामना जिंकला.