17 January 2019

News Flash

उघडले बॅडमिंटनचे दार!

भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात नवी क्रांती घडवू पाहणाऱ्या इंडियन बॅडमिंटन लीगच्या संकल्पनेचा पहिला टप्पा सोमवारी पार पडला. सहा संघांमध्ये रंगलेल्या बॅडमिंटनपटूंच्या लिलावात भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना

भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात नवी क्रांती घडवू पाहणाऱ्या इंडियन बॅडमिंटन लीगच्या संकल्पनेचा पहिला टप्पा सोमवारी पार पडला. सहा संघांमध्ये रंगलेल्या बॅडमिंटनपटूंच्या लिलावात भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचे घरच्या संघाकडून खेळण्याचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. हैदराबाद हॉटशॉट्स संघाने सायनावर एक लाख २० हजार अमेरिकन डॉलरची बोली लावून तिला करारबद्ध केले. मात्र जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला मलेशियाचा चोंग वुई लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला मुंबई मास्टर्स संघाने एक लाख ३५ हजार अमेरिकन डॉलरला विकत घेतले.
सहा ‘आयकॉन’ खेळाडूंपैकी एक असलेल्या सायनाने हैदराबाद किंवा लखनौ या संघांकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. हैदराबादने तिच्यावर जवळपास ७१ लाख २७ हजार ७९६ रुपयांची बोली लावली. चोंग वुईला करारबद्ध करण्यासाठी मुंबई मास्टर्स आणि दिल्ली स्मॅशर्स यांच्यात चांगलीच चुरस रंगली होती. महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या मालकीच्या मुंबई संघाने त्याला (जवळपास ८० लाख १९ हजार ३२ रुपये) करारबद्ध केले. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या पारुपल्ली कश्यपवर बांगी बीट्सने ७५ हजार अमेरिकन डॉलरची (जवळपास ४४ लाख ५५ हजार ६२२ रुपये) बोली लावली.
भारताची युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला लखनौ वॉरियर्सने ८० हजार अमेरिकन डॉलरला (जवळपास ४७ लाख ५२ हजार ६६४ रुपये) विकत घेतले. ज्वाला गट्टाला दिल्ली स्मॅशर्सने ३१ हजार डॉलरला (जवळपास १८ लाख ४१ हजार ६९९ रुपये) करारबद्ध केले. व्हिएतनामच्या टिन्ह मिन्ह युगेन याला विकत घेण्यासाठी दिल्ली आणि पुणे पिस्टॉन्स यांच्यात चुरस रंगली होती. अखेर पुणे संघाने त्याला ४४ हजार डॉलरला (२६ लाख १४ हजार २४ रुपये) विकत घेतले.

घरच्या संघाकडून खेळावे लागणार असल्यामुळे मी खूप आनंदी आहे. हैदराबाद किंवा लखनौ संघाचा मी भाग असावे, अशी माझी इच्छा होती. हैदराबादने मला करारबद्ध केले, ही आनंदाची बातमी आहे. भारतीय बॅडमिंटन लीगमध्ये हैदराबाद संघ चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे. भारतीय बॅडमिंटनसाठी ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल. मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
सायना नेहवाल, अव्वल महिला बॅडमिंटनपटू

या स्पर्धेसाठी मला करारबद्ध करण्यात आल्यामुळे मी खूश आहे. जागतिक स्पर्धेनंतर भारतीय बॅडमिंटन लीगमध्ये खेळल्याने चांगला अनुभव पदरी पडणार आहे. हैदराबाद संघाकडून निवडलो गेलो असतो तर चांगले झाले असते. या स्पर्धेचे सामने हैदराबादमधील गचीबाऊली येथे होणार आहेत. तिथेच माझे घर आहे. – पी. कश्यप, अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू

भारतीय महिलांची एकेरीतील कामगिरी
सायना नेहवाल (एकेरी)
२०१२- लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई
२०१०- नवी दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक
२०१०- आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक
२००९- इंडोनेशिया सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद
२०१०- सिंगापूर, इंडोनेशिया, हाँगकाँग, चायनीज तैपेई येथील सुपर सीरिज स्पर्धाची जेतेपदे
२०११- स्विस स्पर्धेचे जेतेपद
२०१२- स्विस, इंडोनेशिया, डेन्मार्क स्पर्धाची जेतेपदे
पी.व्ही.सिंधू (एकेरी)
२०१३- मलेशिया खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा.
२०१३- आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ली झेरुईवर मात

दुहेरीमधील पराक्रम
२०१०- ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीची नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई.
२०१०- ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पाने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. २०१३- अश्विनी पोनप्पा-प्रज्ञा गद्रे जोडीने मलेशियन खुल्या स्पर्धेत चीनच्या अव्वल मानांकित मा जिन-तांग झिनुहा जोडीवर मात केली.

First Published on July 23, 2013 6:20 am

Web Title: saina nehwal goes to hyderabad hotshots for usd 120000 in ibl auction