लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालला सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय इंडियन ग्रां.प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत अग्रमानांकन देण्यात आले आहे. नुकत्याच चीनमध्ये झालेल्या सुपर सीरिज फायनल्स प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सायनाला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. वर्षांतील शेवटच्या स्पर्धेत शानदार प्रदर्शन करण्याचा सायनाचा मानस आहे. या स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे.
पुरुषांमध्ये तौफिक हिदायत अग्रमानांकित आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणारा पी. कश्यपला द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला दुहेरीत सुवर्णपदक विजेती अश्विनी पोनप्पा, युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांसह अजय जयराम, सौरभ वर्मा असे अव्वल भारतीय बॅडमिंटनपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. १२ विविध देशांतील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत आहेत. दुखापतीनंतर मी पहिल्यांदाच कोर्टवर उतरत आहे, त्यामुळे मी या स्पर्धेबाबत अतिशय उत्सुक आहे. या स्पर्धेद्वारे गुण कमावण्याचा माझा प्रयत्न असेल, मलेशियन खुल्या स्पर्धेसाठी तयारी या दृष्टीने मी या स्पर्धेकडे बघत आहे असे कश्यपने बोलताना सांगितले.