महिला एकेरीतील भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पुरुषांच्या गटात एचएस प्रणॉय यांना आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्राँझ मेडलवर समाधान मानावे लागणार आहे. या दोघांचा शनिवारी झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात पराभव झाला.

नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सायनाचा चीनची टॉप सीडेड ताई यिंगने २५-२७, १९-२१ असा ४५ मिनिटात सलग दोन गेममध्ये पराभव केला. आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेतील सायनाचे हे तिसरे ब्राँझ मेडल आहे. अंतिम फेरीत ताईचा सामना त्यांच्याच देशाच्या सहाव्या सीडेड चेन युफीईशी होणार आहे.

पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत प्रणॉयचा चीनच्या तिसऱ्या सीडेड चेन लाँगने २१-१६, २१-१८ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. ५२ मिनिटे हा सामना चालला. प्रणॉय जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे. प्रणॉयचे आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील हे पहिले मेडल आहे.