सायना नेहवालने स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले. या स्पर्धेचे सलग तिसरे जेतेपद पटकावण्यासाठी आतुर सायनाने चायनीज तैपेईच्या त्झु यिंग ताईचा २१-११, २१-१२ असा सहज पराभव केला.
अवघ्या २९ मिनिटांच्या लढतीत सायनाने सहाव्या मानांकित यिंग ताईचा धुव्वा उडवला. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सायनाने दोन्ही गेममध्ये निर्विवाद वर्चस्व राखत सामना जिंकला. पहिल्या गेममध्ये सायनाने १०-३ अशी भक्कम आघाडी घेतली. मात्र यिंगने ही आघाडी कमी करत १०-१४ अशी कमी केली. मात्र यानंतर सायनाने सलग पाच गुणांची कमाई करत आघाडी बळकट केली. या आघाडीच्या जोरावर सायनाने पहिला गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीला ३-३ अशी बरोबरी होती. मात्र त्यानंतर सायनाने सातत्याने गुण मिळवत आघाडी आपल्याकडे राखली. झटपट सामना जिंकून पुढील सामन्यासाठी तंदुरुस्त राखण्यासाठी उत्सुक सायनाने १३-६ अशा आघाडीनंतर २०-१० अशी आगेकूच केली. पुढचा एक गुण सहजतेने मिळवत सायनाने दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.
उपांत्य फेरीत सायनाचा मुकाबला चीनच्या शिझियान वांगशी होणार आहे. गेल्या वर्षी याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत शिझियानवर मात करत सायनाने जेतेपद पटकावले होते. शिझियानविरुद्ध सायनाची कामगिरी ४-१ असून, शेवटच्या चारही सामन्यांमध्ये सायनाने शिझियानवर वर्चस्व गाजवले आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या ऑल इंग्लंड स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सायनाने शिझियानला नमवले होते.