भारताची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिने ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेतील महिलांच्या गटात उपांत्य फेरी गाठली. मात्र पी. व्ही. सिंधू हिला उपांत्यपूर्व फेरीतच पराभव स्वीकारावा लागला.
सहाव्या मानांकित सायना हिने जपानच्या एरिको हिराशी हिला २१-१८, २१-९ असे हरविले. तिला आता जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित खेळाडू सिक्सियन वाँग हिच्याशी झुंज द्यावी लागणार आहे. आठव्या मानांकित सिंधू हिला चुरशीच्या लढतीत स्पेनच्या कॅरोलिन मेरिन हिच्याविरुद्ध पराभूत व्हावे लागले. हा सामना कॅरोलिन हिने २१-१७, २१-१७ असाजिंकला.
सायना हिने हिरोशीविरुद्धच्या पहिल्या गेममध्ये  सुरुवातीला ४-० अशी आघाडी घेतली. ही आघाडी तिने ८-२ अशी नेली. त्यानंतर हिरोशी हिने चिवट लढत देत १०-१० अशी बरोबरी केली. त्यामुळे सामन्यातील उत्कंठा वाढली. १८-१८ अशा बरोबरीनंतर सायना हिने सलग तीन गुण घेत पहिली गेम घेतली.  दुसऱ्या गेममध्ये सायनाने निर्विवाद वर्चस्व गाजविले. तिने ड्रॉपशॉट्सबरोबर स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचाही बहारदार खेळ केला.
सामना संपल्यानंतर सायना म्हणाली, हिरोशी ही जिगरबाज खेळाडू आहे. तिने खूप चांगला खेळ केला. मात्र मी मनासारखा खेळ करीत विजय मिळविल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. त्याचा फायदा मला उपांत्य लढतीसाठी होणार आहे.