भारताच्या सायना नेहवालने सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद राखण्यासाठी शानदार सुरुवात केली. सलामीच्या सामन्यात विजयासाठी संघर्ष करावा लागला तरी सायनाने सिंगापूरच्या युआन गुओ हिचे आव्हान परतवून लावले. पुरुषांमध्ये, बी. साईप्रणीथने द्वितीय मानांकित युआन हुओ या स्थानिक खेळाडूवर मात करीत सनसनाटी विजय नोंदवला. पी. सी. तुलसी, अरुंधती पानतावणे, सौरभ वर्मा, अजय जयराम, किदम्बी श्रीकांत व आनंद पवार या भारताच्या अन्य बॅडमिंटनपटूंचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
गतविजेत्या सायनाला सिंगापूरच्या युआन गुओ हिच्याविरुद्ध २१-१४, २३-२१ असा विजय मिळविताना झगडावे लागले. सायनाच्या चुकांमुळे गुओ हिच्या खात्यात गुणांची भर पडत गेली. पण सायनाने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावून परतीच्या तसेच स्मॅशेसच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवत विजय संपादन केला.
राष्ट्रीय विजेती तुलसी हिला पराभवाला सामोरे जावे लागले. इंडोनेशियाच्या लिंडावेनी फानेत्री हिने तिच्यावर २१-२३, २१-१६, २१-१४ असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. लिंडावेनी हिची सहकारी पोतंया नेदेलचेवा हिने अरुंधती पानतावणे हिच्यावर २१-१८, २१-१८ अशी मात केली.
पुरुषांमध्ये, साईप्रणीथने युआन हुओ याला २१-१९, १८-२१, २१-१७ असा पराभवाचा धक्का दिला. साईप्रणीथने स्मॅशच्या जोरकस फटक्यांचा बहारदार खेळ केला. हाँगकाँगच्या विंग कीवोंगने सौरभ वर्माला २१-१७, २१-१७ असे पराभूत केले. जपानच्या केनिची तागोने अजय जयरामवर २१-१९, १८-२१, २१-१७ असा विजय मिळविला. अग्रमानांकित पेंगुयु दियूने आनंद पवारचा २१-१६, २१-१३ असा सहज पाडाव केला. थायलंड स्पर्धा विजेत्या किदम्बी श्रीकांत याच्या कामगिरीवर सर्वाचे लक्ष लागले होते. पण व्हिएतनामच्या तियान मिन निग्वेनकडून त्याला पहिल्या फेरीतच १९-२१, २१-१६, २१-१२ असा गाशा गुंडाळावा लागला.
मिश्र दुहेरीत, अरुण विष्णू व अपर्णा बालन यांनी सोगफोन अनुग्रीटावापोन व कुंचला विचिचौकुल यांचा २१-१९, १९-२१, २१-१६ असा पराभव केला. वरुण कोना व अश्विनी पोनप्पा यांना मात्र हार पत्करावी लागली. तोंतोनी अहमद व लिलियाना नात्सिर यांनी त्यांच्यावर २१-६, २१-१० असा सफाईदार विजय मिळविला.