भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांतने आपापले सामने जिंकून मलेशिया मास्टर्स चषकाच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सायनाने महिला एकेरीत तर श्रीकांतने पुरूष एकेरीत विजय नोंदवला. ऑलिम्पिक शटलर सायनाने हाँगकाँगच्या पुई यिन यिपला सरळ सेटमध्ये २१-१४,२१-१६ असे पराभूत केले.
या टुर्नामेंटमध्ये सायनाला सातवे मानांकन देण्यात आले आहे. सायनाला हा सामना जिंकण्यास ३९ मिनिटांचा अवधी लागला. आता तिचा सामना जपानच्या नोजोमी ओकुहाराशी असेल. जगात नवव्या क्रमांकावर असलेल्या सायनाने ओकुहाराविरोधात खेळलेल्या सामन्यात १२ सामन्यांपैकी ८ मध्ये विजय मिळवलेला आहे. तिने मागील वर्षी डेन्मार्क ओपन आणि फ्रेंच ओपनमध्येही ओकुहाराला पराभूत केले होते. सायनाने हा सामना जिंकल्यास तिचा चौथ्या मानांकन प्राप्त स्पेनच्या कॅरोलिना मारिनशी होऊ शकतो.
तर दुसरीकडे श्रीकांतने पुरूष एकेरीत हाँगकाँगच्या विन्सेंट विंग की वोंगवर २३-२१, ८-२१, २१-१८ मात करत उपउपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. त्याने पहिला सेट जिंकला पण दुसऱ्या गेममध्ये विन्सेंटने पुनरागमन करत २१-८ असा विजय मिळवला. तिसरा आणि निर्णायक गेम खडतर राहिला. परंतु, यात श्रीकांतने २१-१८ असा विजय नोंदवत पुढच्या फेरीत प्रवेश केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2019 4:32 pm