सामन्यापूर्वी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब झालेल्या सायनाने उपांत्य फेरीच्या लढतीत दिमाखदार विजयासह भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. पुरुषांमध्ये किदम्बी श्रीकांतनेदेखील अंतिम फेरीत आगेकूच केली.
सायनाने जपानच्या युई हाशिमितोवर २१-१५, २१-११ असा विजय मिळवला. ड्रॉपशॉट्स आणि स्मॅशेसचा प्रभावी उपयोग करत सायनाने सातत्याने गुण पटकावत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सायनाने ८-२ अशी भक्कम आघाडी मिळविली. १५-३ अशी आघाडी मिळविल्यानंतर सायनाच्या खेळात थोडीशीk03 शिथिलता आली. त्याचा फायदा घेत हाशिमोतो हिने काही गुण मिळवित खेळात रंगत आणली. मात्र सायनाने हा गेम २१-१३ असा जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत तिचा मुकाबला थायलंडच्या रत्नाचोक इन्थॅनॉनशी होणार आहे.
श्रीकांतने चीनच्या झ्यू सोंगवर २१-१६, २१-१३ अशी मात केली. सर्वागीण वावर, तडाखेबंद स्मॅशेसचा वापर आणि नेटजवळून केलेला
सुरेख खेळ श्रीकांतच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले. अंतिम फेरीत श्रीकांतची लढत व्हिक्टर अ‍ॅक्सलेनशी होणार आहे.