कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून विश्रांती घेतल्यानंतर भारताची फुलराणी सायना नेहवाल डेन्मार्क स्पर्धेत जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाली आहे. डच खुल्या स्पर्धेत जेतेपदाची कमाई करणारा अजय जयरामकडूनही जेतेपदाच्या अपेक्षा आहेत.
२०१२ मध्ये सायनाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. यंदाच्या वर्षांत दिमाखदार कामगिरी करणाऱ्या सायनाला आणखी एक जेतेपद नावावर करण्याची उत्तम संधी आहे. सलामीच्या लढतीत सायनाची लढत थायलंडच्या ब्युसानन ओंगबुमारुनग्फानशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीनंतरच सायनासमोर तुल्यबळ खेळाडूंचे आव्हान असणार आहे.
दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर पी. व्ही. सिंधूच्या कामगिरीतले सातत्य हरवले आहे. डेन्मार्क स्पर्धेद्वारे हरवलेली लय मिळवण्याची सिंधूला संधी आहे. तिची पहिली लढत इंडोनेशियाच्या मारिआ फेबे कुसुमास्तुतीशी होणार आहे.
दुखापतीतून सावरत शानदार पुनरागमन करणाऱ्या अजयने कोरिया सुपर सीरिज स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली होती. त्या स्पर्धेत जेतेपदाने हुलकावणी दिली होती. या पराभवातून बोध घेत अजयने डच खुल्या स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले होते. या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी अजय आतुर आहे. मात्र त्याला पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागणार आहे. सलामीच्या लढतीत त्याच्यासमोर जर्मनीच्या फॅबिअन रोथचे आव्हान असणार आहे. पुरुषांमध्ये किदम्बी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप आणि एच. एस. प्रणॉय भारताचे अन्य प्रतिनिधी असणार आहेत. कश्यपला सलामीच्या लढतीतच बलाढय़ ली चोंग वेईचा अडथळा पार करावा लागणार आहे. प्रणवची लढत तैपेईच्या ह्स्यू जेन हो याच्याशी होणार आहे.
डच खुल्या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या मनू अत्री आणि सुमीत रेड्डी यांची पहिली लढत इंग्लंडच्या मार्कुस एलिस आणि ख्रिस लँग्रिज जोडीशी होणार आहे.
दुखापतीतून सावरलेली ज्वाला गट्टा पुनरागमन करत असून ज्वाला-अश्विनी जोडीचा पहिला मुकाबला रेइका काकिवा आणि मियुकी मेइडा जोडीशी होणार आहे.