भारताची फुलराणी सायना नेहवालला आणखी एका जेतेपदाने हुलकावणी दिली. दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या सायनाने दिल्लीत झालेल्या इंडिया खुल्या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मलेशिया स्पर्धेत ही कामगिरी सुधारण्यासाठी सायना आतूर होती. मात्र या स्पर्धेतही सायनाला उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. सायनाच्या पराभवासह भारताचे स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आले.

तैपेईच्या ताइ झ्यू यिंगने सायनावर २१-१९, २१-१३ अशी मात केली. यिंगविरूद्धच्या १२ पैकी सात लढतीत सायनाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ऑल इंग्लंड स्पर्धेतही यिंगनेच सायनाला नमवण्याची किमया केली होती. स्विस खुली तसेच इंडिया खुल्या स्पर्धेनंतर उपांत्य फेरीत गारद होण्याची सायनाची ही तिसरी वेळ आहे. सायनासमोरचे पुढचे आव्हान सिंगापूर सुपरसीरिजचे आहे.

यिंगने शैलीदार फटक्यांसह वेगवान रॅलीजवर भर दिला. पायाच्या घोटय़ाच्या दुखापतीतून सावरणाऱ्या सायनाला या झंझावाताला सामोरे जाणे कठीण गेले. तिच्या खेळातला स्वैरपणा वाढला आणि यिंगने विजय साकारला. पहिल्या गेममध्ये सायना ०-७ अशा पिछाडीवर होती. ही आघाडी कायम राखत यिंगने २०-१४ अशी भक्कम आगेकूच केली. मात्र यानंतर सायनाने आपला खेळ उंचावत पाच मॅचपॉइंट वाचवले. मात्र ड्रॉपच्या खुबीच्या फटक्यासह यिंगने बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये ६-६ अशी बरोबरीची स्थिती होती. मात्र यिंगने आक्रमक पवित्रा स्वीकारत ११-९ अशी निसटती आघाडी घेतली. सायनाच्या चुकांचा पुरेपूर फायदा उठवत यिंगने १९-१३ अशी मजबूत आघाडी घेतली. सायनाच्या आणखी एक स्वैर फटक्यासह यिंगने दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.