पहिल्याच लढतीत सायना अपयशी

उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत कॅनडाबरोबर झालेल्या सलामीच्या लढतीत भारतीय संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालसह अन्य बॅडमिंटनपटूंनादेखील चमक दाखवता न आल्याने या लढतीत भारताला १-४ असा पराभव पत्करावा लागला.

महिलांच्या गटात भारतीय संघ ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्य पदकविजेती पी.व्ही. सिंधू तसेच राष्ट्रकुलमधील कांस्यपदक विजेती एन. सिक्की व अश्विनी पोनप्पा या जोडीविना उतरला आहे. त्यांच्या अनुपस्थितीचा फटका भारताला बसला. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या सायना नेहवालचा पहिलाच सामना भारताने २१-१५, १६-२१, १६-२१ असा गमावला. मिशेल ली हिने तीन गेममध्ये सायनाला पराभूत केल्याने भारतीय संघ सलामीलाच पिछाडीवर पडला. त्यानंतर भारताच्या वैष्णवी रेड्डी जक्काचा रॅचेल हॉन्डेरिचने ११-२१, १३-२१ असे पराभूत करून ही आघाडी २-० ने वाढवली. दुहेरीमध्ये भारताच्या मेघना जक्कामपुडी आणि पूर्वीशा एस राम या जोडीने मिचेल टॉँग व जोसेफाइ वु या जोडीला २१-१९, २१-१५ असे अवघ्या २७ मिनिटांत पराभूत करून भारतासाठी आशा निर्माण केली. त्यानंतर भारताच्या श्रीकृष्णा प्रिया कुडारवल्लीला ब्रिटनी टॅमने ११-२१, १६-२१ असे पराभूत केल्याने कॅनडाने ३-१ अशी विजयी आघाडी मिळवली. अखेरच्या सामन्यात भारताच्या संयोगिता घोरपडे आणि प्राजक्ता सावंत या जोडीला रॅचेल हॉन्डेरिच व क्रिसेन त्साई या जोडीने १५-२१, १६-२१ असे पराभूत केले. भारतीय महिलांनादेखील पुढील सामना सोमवारी ऑस्ट्रेलियाशी खेळावा लागणार आहे.

आजचा सामना

  • महिला : भारत वि. ऑस्ट्रेलिया
  • वेळ : दुपारी १२.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २