जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान हा कोणत्याही बॅडमिंटनपटूसाठी गौरवाचा क्षण असतो. या महिन्यात होणाऱ्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेद्वारे भारताची फुलराणी सायना नेहवालचे हे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याची शक्यता होती. मात्र खांद्याच्या दुखापतीमुळे अव्वल स्थानाचे स्वप्न लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.  ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत सायनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेत चीनच्या खेळाडूंवर मात करणाऱ्या सायनाने क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. २४ मार्चपासून नवी दिल्लीत सुरू होणाऱ्या इंडिया ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यास सायना क्रमवारीत अव्वल स्थान पटकावू शकते. सायनाला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्यास किंवा ऑल इंग्लंड स्पर्धेची विजेती कॅरोलिन मारिनने इंडिया ओपनचे जेतेपद पटकावल्यास सायनाचे स्वप्न लांबणीवर पडू शकते. मात्र खांद्याच्या दुखापतीमुळे सायनाच्या या स्पर्धेत खेळण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  ‘‘खांद्याला दुखापत झाली आहे. लवकरच या दुखापतीतून सावरेन,’’ असे सायनाने ट्विटर हँडलवर म्हटले आहे. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेदरम्यान हा त्रास जाणवल्याचे सायनाने म्हटले आहे.