भारताची फुलराणी सायना नेहवालने औपचारिकरीत्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान ग्रहण केले आहे. जागतिक बॅडमिंटन संघटनेने गुरुवारी जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार, सायना महिला खेळाडूंच्या क्रमवारीत शिखरस्थानी आहे. हे स्थान पटकावणारी सायना पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. चीनच्या खेळाडूंची अव्वल स्थानावर असलेली मक्तेदारी मोडून काढत सायनाने हे यश मिळवले आहे.
अव्वल स्थानी झेप घेण्यासाठी सायनाला भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारणे अपेक्षित होते. मात्र काही दिवसांपूर्वीच प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन
स्पर्धेत सायनाला नमवणाऱ्या कॅरोलिन मारिनला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला.
कॅरोलिनच्या पराभवामुळे उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वीच सायनाच्या अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब झाले. मात्र या बातमीने हुरळून न जाता सायनाने उपांत्य आणि त्यानंतर
अंतिम लढतीतही बाजी मारत कारकिर्दीत पहिल्यांदाच भारतीय
खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला.
कॅरोलिन क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असून आहे तर चीनची ली झेरुई तिसऱ्या स्थानी आहे. सध्या दुखापतीमुळे स्पर्धापासून दूर असलेली पी.व्ही.सिंधू नवव्या
स्थानी स्थिर आहे. भारतीय खुल्या स्पर्धेचा विजेता किदम्बी श्रीकांत पुरुषांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी स्थिर आहे.