मागील तीन ऑलिम्पिकपेक्षा टोक्योतील ऑलिम्पिक हे अधिक अवघड आव्हान असल्याने तंदुरुस्ती सुधारण्यावर अधिक भर देत आहे, असे भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने सांगितले.

सायना ही २०१५मध्ये काही आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर होती. त्यानंतर २०१६मध्ये तिच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने प्रदीर्घ काळ खेळापासून दूर राहावे लागले होते. त्यानंतर सायनाने दोन वर्षांपूर्वी पुनरागमन केले, मात्र त्यात सायना पुन्हा पहिल्या पाचात पोहोचू शकलेली नाही. किंबहुना तिची तंदुरुस्तीदेखील गुडघेदुखीपूर्वीच्या काळातील राहू शकलेली नाही. त्यामुळे सायनाने परतल्यानंतर काही स्पर्धामध्ये विजेतेपद पटकावले असले तरी अद्यापही ती चार वर्षांपूर्वीइतकी लयीत आलेली नाही.

या पाश्र्वभूमीवर सायना म्हणाली, ‘‘टोक्योतील स्पर्धा ही अधिक अवघड असेल. चीनचे खेळाडू खूपच बहरात खेळत आहेत. त्याशिवाय अन्य मुलीदेखील खूप चांगला खेळ करीत आहेत. अशा परिस्थितीत ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हे खूप अवघड आव्हान आहे. मात्र सध्या तरी मी ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित केलेले नाही. किंबहुना त्यासाठी पात्रता मिळवण्यासाठीदेखील मी प्रयत्न केलेले नाहीत. मी पुढील स्पर्धामध्ये अधिकाधिक चांगली कामगिरी करण्याबाबतच विचार करीत आहे. तसेच त्या काळात स्वत:ला दुखापत होऊ नये, यासाठीदेखील काळजी घेणार आहे.’’

सायनाने तंदुरुस्तीच्या कारणास्तव इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धेत खेळणे टाळले होते. आता पुढे होणाऱ्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायनाचा खेळण्याचा मानस आहे. जगात होणाऱ्या १५ सुपर सीरिजपैकी १२ सुपर सीरिज खेळणे अव्वल खेळाडूंना बंधनकारक असल्याने खेळाडूंवर अतिरिक्त ताण येतो. त्याबाबत सायनाने बॅडमिंटन जागतिक महासंघाकडेदेखील तक्रार केली असली तरी त्याला अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याचे तिने सांगितले.