पुरुष बॅडमिंटन संघाची निराशाजनक कामगिरी

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालच्या महत्त्वपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने उबेर चषक जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आगेकूच केली. त्यांनी जर्मनीवर ५-० अशी मात केली. मात्र पुरुषांच्या थॉमस चषक स्पध्रेत हाँगकाँगने भारताला ३-२ असे हरवले.

महिलांमध्ये सायनाने जर्मनीच्या फॅबिएनी देप्रेझवर २१-१५, २१-१० अशी मात केली. पाठोपाठ पी. व्ही. सिंधूने लुसी हेईमला २१-७, २१-१२ असे पराभूत करीत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. माजी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांनी लिंडा एफलेर व लारा केईप्लेईन यांच्यावर १२-२१, २१-९, २१-८ अशी मात करीत भारताचा विजय निश्चित केला. त्यानंतर औपचारिकता राहिलेल्या लढतीत जी. ऋत्विका शिवानीने युवोनी ली हिचा २१-१५, २१-१५ असा पराभव केला. एन. सिक्की रेड्डी व सिंधू यांनी इसाबेल हेर्तिच व फ्रान्सिस्का व्होल्कमन यांच्यावर २१-१८, १९-२१, २२-२० असा निसटता विजय मिळवला व भारताला ५-० असे निर्विवाद यश मिळवून दिले.

साखळी गटात भारताची २०१४च्या उपविजेत्या जपानशी गाठ पडणार आहे. हा सामना बुधवारी होईल. गत वेळी उपांत्य फेरीत भारताला जपानने ३-२ असे हरवले होते.

पुरुषांच्या विभागात हाँगकाँगविरुद्ध निगका लोंग अँगुसने भारताच्या अजय जयरामला २१-१३, २१-१२ असे हरवले. पाठोपाठ मनू अत्री व सुमेध रेड्डी यांना दुहेरीत पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या बी. साईप्रणितने एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीतील १४व्या मानांकित हु युआनला २३-२१, २३-२१ असे हरवले आणि लढतीत रंगत निर्माण केली. मात्र सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांना त्झिकित चान व चुएक हिमलो यांनी २१-१०, २१-११ असे पराभूत करीत लढतीत ३-१ अशी विजयी आघाडी मिळवली. त्यानंतर औपचारिकता राहिलेल्या सामन्यात भारताच्या सौरभ वर्माने नान वेईवर १७-२१, २१-१९, २१-९ अशी मात केली. भारताची साखळी गटात बुधवारी इंडोनेशियाबरोबर लढत होणार आहे.