सायनाची विजयी सलामी, सायनाची आगेकूच, घोडदौड आणि त्यानंतर सायनाचे आव्हान संपुष्टात या वाक्यांना आता सायनाचे चाहतेही सरावले आहेत. स्पर्धागणिक जेतेपदाचे स्वप्न तिच्यापासून लांब जात आहे. सिंगापूर येथे सुरू झालेल्या सुपरसीरिज स्पर्धेत तर सलामीच्या लढतीतच सातव्या मानांकित सायनाला बिगरमानांकित खेळाडूकडून पराभवाला सामोरे जावे लागले. सायनाच्या बरोबरीने पारुपल्ली कश्यपलाही पहिल्याच सामन्यात अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र युवा पी.व्ही.सिंधूने संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसरी फेरी गाठली.
नुकत्याच झालेल्या भारत खुल्या सुपरसीरिज स्पर्धेत सायनाला उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या सय्यद मोदी ग्रां.प्रि. स्पर्धेचे जेतेपद पटकावत सायनाने फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले होते. मात्र या जेतेपदानंतर सायनाच्या कामगिरीत झालेली घसरण अद्याप थांबलेली नाही. जपानच्या इरिका हिरोसेने चुरशीच्या लढतीत सायनावर १६-२१, २१-१५, २१-११ असा विजय मिळवला. एक तासाहून अधिक काळ चाललेल्या लढतीत सायनाने पहिल्या गेममध्ये ५-२ अशी आघाडी घेतली. तिने ही आघाडी १३-४ अशी वाढवली. या आघाडीच्या बळावरच तिने पहिला गेम २१-१६ असा नावावर केला. दुसऱ्या गेममध्येही सायनाने ४-२ अशी आघाडी घेतली. मात्र हिरोसेने ४-४ अशी बरोबरी केली. त्यानंतर तिने १०-४ अशी आगेकूच केली. यानंतर सायनाचा खेळ आणखी मंदावला. दुसरा गेम जिंकत हिरोसेने मुकाबला तिसऱ्या गेममध्ये नेला. तिसऱ्या गेममध्ये सायनाने ५-० अशी दमदार आघाडी घेतली. या आघाडीच्या आधारे तिसऱ्या गेमसह हिरोसेने सामना जिंकला.
आठव्या मानांकित सिंधूने इंडोनेशियाच्या मिलिसन्ट विरान्टोवर २१-९, १९-२१, २२-२० असा विजय मिळवत दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. जागतिक क्रमवारीत आणि मानांकनातही अव्वल स्थानी असलेल्या चीनच्या ली झेरूईने मुंबईकर तन्वी लाडचा २१-६, २१-११ असा धुव्वा उडवला. पी.सी. तुलसीने ऑस्ट्रेलियाच्या अना रॅनकिनचा २१-१३, २१-१६ असा पराभव केला. जपानच्या सिझुका उचिडाने अरुंधती पनतावणेवर १६-२१, २१-११, २१-१५ अशी मात केली.
कोरियाच्या डोंग केअन लीने कश्यपवर १६-२१, २१-१५, २२-२० असा विजय मिळवला. पहिला गेम जिंकत कश्यपने सुरुवात चांगली केली मात्र त्यानंतर त्याची लय हरपली. साईप्रणीथने मलेशियाच्या मोहम्मद अरिफ अब्दुल लतीफचा २१-१३, २१-१५ असा पराभव केला. प्रणॉयने थायलंडच्या थामसिन सिथीकोमवर २१-१७, १४-२१, २१-११ असा विजय मिळवला. इंडोनेशियाच्या डिओनीस्युअस हायोम रुमबाकाने आनंद पवारचा २१-१०, २१-१५ असा धुव्वा उडवला.