गुरुवारी अधिकृतघोषणेची शक्यता; सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, के. श्रीकांत यांचा समावेश
भारताच्या सात बॅडमिंटनपटूंना ऑगस्टमध्ये होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक स्पध्रेची पात्रता मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून गुरुवारी जागतिक बॅडमिंटन संघटनेकडून याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. भारताकडून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी ही बॅडमिंटनपटूंची सर्वाधिक संख्या असेल.
आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा या ऑलिम्पिकच्या अखेरच्या पात्रता फेरीतून ही निवड करण्यात आली आहे. यामध्ये सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत, ज्वाला गट्टा, अश्विनी पोनप्पा, मनू अत्री आणि सुमीथ रेड्डी यांच्या नावांचा समावेश आहे. ५ मे रोजी जाहीर होणाऱ्या जागतिक क्रमवारीनुसार खेळाडूंची ऑलिम्पिकवारी निश्चित होणार आहे.
एकेरी प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल १६ मध्ये असलेल्या दोन खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेता येणार आहे. त्यानुसार सायना आणि सिंधू यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. पहिल्यांदाच महिला एकेरीत भारताच्या दोन खेळाडू ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणार आहेत. पारुपल्ली कश्यपच्या दुखापतीमुळे पुरुष एकेरीत केवळ श्रीकांतला संधी मिळणार आहे.