जेतेपदाचे दावेदार असलेल्या भारताच्या तिन्ही बॅडमिंटनपटूंना स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले. सहाव्या मानांकित सायना नेहवालला उपांत्यपूर्व फेरीतच तर सातव्या मानांकित पी.व्ही.सिंधू आणि पुरुषांमध्ये तृतीय मानांकित पारुपल्ली कश्यपला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. या त्रिकुटाचा पराभव झाल्याने स्पर्धेतही भारतीय आव्हानही संपुष्टात आले आहे. शनिवारी झालेल्या लढतींमध्ये चीनच्या सन युने सिंधूवर १८-२१, २१-१२, २१-१९ अशी मात केली. प्रदीर्घ रॅली आणि शैलीदार फटक्यांच्या आधारे सिंधूने पहिला गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये युने पुनरागमन करत दुसरा गेम नावावर केला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सिंधूने प्रत्येक गुणासाठी युनला झुंजवले. दोन मॅचपॉइंट्स वाचवत सिंधूने परतण्याचा प्रयत्न केला मात्र युनने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत बाजी मारली. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने ऑल इंग्लंड स्पर्धेची विजेती सिझियान वांगवर खळबळजनक विजय मिळवत अपेक्षा वाढवल्या होत्या. मात्र चीनच्या आणखी एका खेळाडूसमोर अविरत संघर्षांनंतर तिचा पराभव झाला.
सहाव्या मानांकित सायनाचा प्रवास ऑल इंग्लंड स्पर्धेप्रमाणेच या स्पर्धेतही उपांत्यपूर्व फेरीपुरताच मर्यादित राहिला. जागतिक क्रमवारीत तृतीय स्थानी असलेल्या यिहान वांगने सायनावर २१-१७, २१-१२ असा विजय मिळवला. यिहानविरुद्धचा सायनाचा हा सातवा पराभव आहे.
पुरुषांमध्ये भारताचा एकमेव प्रतिनिधी असलेल्या कश्यपला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. चीनच्या हौऊवेईने पारुपल्ली कश्यपवर २१-१७, २१-११अशी मात केली. उपांत्यपूर्व फेरीत सहाव्या मानांकित तिआन चेन चूला नमवत कश्यपने उपांत्य फेरी गाठली
 होती.