आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी कामगिरीत  सुरेख सातत्य राखत भारत खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. अन्य लढतींमध्ये मात्र भारताच्या पदरी निराशाच आली. आरएमव्ही. गुरुसाईदत्त, सौरभ वर्मा, सायली गोखले, तृप्ती मुरगुंडे यांच्यासह ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले.
जागतिक क्रमवारीत आणि स्पर्धेच्या मानांकनातही आठव्या स्थानी असलेल्या सायनाने थायलंडच्या नतचा सेइंगचोटेवर २१-१५, २१-१२ असा सहज विजय मिळवला. कारकिर्दीत पहिल्यांदाच नतचाविरुद्ध खेळणाऱ्या सायनाने सुरुवात सावधपणे केली. मात्र त्यानंतर आक्रमक आणि वेगवान खेळ करत तिने हा सामना जिंकला. नतचाने सुरेख पदलालित्यासह खेळ करताना सायनाला काही वेळा चुका करण्यास भाग पाडले. मात्र त्यानंतर सायनाने दमदार स्मॅशेस आणि नेटजवळून चांगला खेळ करत पहिला गेम आपल्या नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये १५-४ अशी भक्कम आघाडी घेत सायनाने विजयाची पायाभरणी केली. ही आघाडी वाढवत दुसऱ्या गेमसह सायनाने सामन्यावर कब्जा केला. आतापर्यंत सोप्या आव्हानांचा सामना केलेल्या सायनासमोर उपांत्यपूर्व फेरीत मात्र तृतीय मानांकित यिहान वांगचे असणार आहे.
पुरुषांमध्ये, पारुपल्ली कश्यपने गोपीचंद अकादमीतील आपलाच सहकारी आरएमव्ही गुरुसाईदत्तवर चुरशीच्या लढतीत २१-१५, १६-२१, २१-११ अशी मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. सलामीच्या लढतीत सहाव्या मानांकित चीनच्या झेन मिंगला नमवत आत्मविश्वास उंचावलेल्या कश्यपने पहिल्या गेममध्ये ७-३ अशी आघाडी मिळवली. या आघाडीच्या बळावरच कश्यपने स्मॅशच्या फटक्यांचा प्रभावीपणे उपयोग करत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र गुरुसाईदत्तने रॅलीजचा वेग कमी करत शटलवर नियंत्रण मिळवले. शैलीदार खेळ करत गुरुसाईदत्तने दुसऱ्या गेममध्ये कश्यपला मागे टाकले. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये कश्यपने पुन्हा एकदा वेगवान खेळ करत वर्चस्व गाजवले.
चीनच्या क्विंग तिआन आणि युनलेई झाओने ज्वाला-अश्विनी जोडीवर २१-१३, २१-१९ अशी मात केली. कोरियाच्या येआन ज्यु बेने सायली गोखलेला २१-१५, २१-८ असे नमवले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मलेशियाच्या ली चोंग वेईने सौरभ वर्माचा २१-९, २१-६ असा धुव्वा उडवला. इंडोनेशियाच्या अप्रिला युसवानडरीने तृप्ती मुरगुंडेचा २१-१३, २१-१२ असा पराभव केला.