राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेमध्ये बॅडमिंटनची पाच पदके जिंकण्याच्या भारताच्या आशांना जोरदार धक्का बसला आहे. दुखापतीतून सावरू न शकलेल्या गतविजेत्या सायना नेहवालने ग्लासगोला २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल स्पध्रेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद जिंकताना सायनाच्या पायाला दुखापत झाली होती. ‘‘हा खरेच अत्यंत कठीण निर्णय आहे. पण महत्त्वाचा आहे,’’ अशी भावनिक प्रतिक्रिया सायनाने व्यक्त केली.
‘‘ऑस्ट्रेलियातील स्पध्रेच्या पहिल्याच फेरीप्रसंगी मला दुखापत जाणवू लागली, परंतु तरीही मी त्यावर मात करीत जेतेपद प्राप्त केले. त्यामुळे दुखापतीची तीव्रता अधिक जाणवू लागली. त्यानंतर भारतात परतल्यावर राष्ट्रकुल स्पध्रेच्या तयारीसाठी फक्त अडीच आठवडय़ांचा कालावधी उपलब्ध होता. त्यापैकी एका आठवडय़ाच्या विश्रांतीनंतर तयारीसाठी फक्त आठवडाच मिळत होता. त्यामुळे मी स्पध्रेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मला हा निर्णय घेणे खूप कठीण गेले,’’ असे सायनाने सांगितले.
ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी सायना गुडघ्याच्या दुखापतीशीही सामना करीत आहे. ती पुढे म्हणाली, ‘‘पुढील हंगामासाठी तंदुरुस्त राहण्यासाठी मला ग्लासगोच्या राष्ट्रकुल स्पध्रेतून माघार घ्यावी लागली. ऊर्वरित हंगामात विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धा ही महत्त्वाची आव्हाने समोर आहेत.’’
‘‘मी राष्ट्रकुल स्पध्रेच्या दृष्टीने सरावाला प्रारंभ केला होता. मी खेळू शकेन, अशी मला आशा होती. परंतु मला माझ्या दुखापतीची पुन्हा जोखीम घ्यायची नव्हती. ऊर्वरित हंगामासाठी मला तंदुरुस्त राहायचे आहे. त्यामुळेच हा निर्णय मी घेतला,’’ असे सायनाने सांगितले.
‘‘मोठय़ा स्पध्रेला सामोरे जाताना शंभर टक्के तंदुरुस्तीनिशीच जावे. माझा खेळ चांगला होतो आहे आणि मी स्पर्धा जिंकते आहे, त्यावेळी ही काळजी घेणे मला आवश्यक वाटते. भारतासाठी आणखी पदक जिंकणे, हेच माझे ध्येय आहे,’’ असे सायना यावेळी म्हणाली.
२०१०मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत सायनाने मलेशियाच्या वाँग मिव च्यूचा पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. याबाबत २४ वर्षीय सायना म्हणाली, ‘‘राष्ट्रकुल स्पध्रेसाठी माझ्याकडे संभाव्य विजेती म्हणून पाहिले जात हाते, याची मला जाणीव होती. मी गतविजेती असले तरी मला जेतेपद प्राप्त करण्याच्या दृष्टीने १०० टक्के तंदुरुस्तीची आवश्यकता होती. खेळात हे महत्त्वाचे असते.’’
मागील राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत भारताने बॅडमिंटनमध्ये चार पदकांची कमाई केली होती. महिला एकेरीत सायनाने सुवर्ण, तर ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीने महिला दुहेरीत सुवर्णपदक कमावले होते. याचप्रमाणे परुपल्ली कश्यपने पुरुष एकेरीत कांस्य, तर सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकले होते.