06 July 2020

News Flash

सायनाच्या अनुपस्थितीत भारताची परीक्षा!

राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांच्या दृष्टीने बॅडमिंटन हा खात्रीशीर खेळ. लंडन ऑलिम्पिकनंतर खराब फॉर्म आणि दुखापतींनी ग्रासलेल्या फुलराणी सायना नेहवालने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन सुपर सीरिजचे जेतेपद पटकावले.

| July 20, 2014 06:51 am

राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांच्या दृष्टीने बॅडमिंटन हा खात्रीशीर खेळ. लंडन ऑलिम्पिकनंतर खराब फॉर्म आणि दुखापतींनी ग्रासलेल्या फुलराणी सायना नेहवालने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन सुपर सीरिजचे जेतेपद पटकावले. तिच्या यशाने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या पदकाच्या आशा पल्लवित झाल्या. चार वर्षांपूर्वी दिल्लीत घरच्या मैदानावर सुवर्णपदक पटकावणारी सायना हे पदक आपल्याकडेच राखणार अशी चर्चा होती. मात्र पायाच्या दुखापतीने हैराण सायनाने माघार घेतल्याने भारतीय बॅडमिंटनचा चेहरा आणि नेतृत्त्व दोन्हीवर मर्यादा आल्या आहेत. सायनाच्या अनुपस्थितीने युवा सिंधूवरची जबाबदारी वाढली आहे. ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा ही अनुभवी जोडी रिंगणात असल्याने भारतीय संघाला बळकटी मिळाली आहे. जागतिक क्रमवारीत घसरण झालेल्या कश्यपला पदकासह विजयपथावर परतण्याची ही सुरेख संधी आहे.  
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन हा भारतासाठी पदकाची आशा असलेला खेळ आहे. आतापर्यंत भारताने या स्पर्धेत ४ सुवर्ण, ३ रौप्य आणि ८ कांस्यपदके पटकावली आहेत. १९७८ मध्ये प्रकाश पदुकोण यांनी तर १९८२ मध्ये सय्यद मोदी यांनी पुरुष एकेरीत सुवर्णपदक पटकावले होते. नवी दिल्लीत झालेल्या २०१० साली झालेल्या स्पर्धेत सायना नेहवालने महिला एकेरीत तर ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीने महिला दुहेरीत जेतेपदावर नाव कोरले होते.
सायनाच्या अनुपस्थितीत पी. व्ही. सिंधू आणि पी. सी. तुलसी यांच्यावर महिला एकेरीची भिस्त आहे. सिंधूला पुन्हा एकदा मोठय़ा स्पर्धेत आपले कर्तृत्त्व सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. लंडन ऑलिम्पिकनंतर विश्रांती घेणाऱ्या ज्वाला गट्टाने अश्विनी पोनप्पाच्या साथीने दमदार पुनरागमन केले आहे. सुवर्णपदक राखण्यासाठी ही अनुभवी जोडी उत्सुक आहे. बॅडमिंटनचे सत्ताकेंद्र असलेला चीन आणि मलेशियाचा ली चोंग वेई स्पर्धेत खेळू शकणार नसल्याने पारुपल्ली कश्यपला पदकाची आशा आहे. दुखापतींनी ग्रासलेल्या कश्यपला राष्ट्रकुल पदकासह दिमाखदार पुनरामगनाची संधी आहे. त्याला युवा किदम्बी श्रीकांत आणि आरएमव्ही गुरुसाईदत्त यांची साथ आहे. पुरुष दुहेरीत ठाणेकर अक्षय देवलकर आणि प्रणव चोप्रा ही तडफदार जोडी भारताचे आशास्थान आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2014 6:51 am

Web Title: saina nehwal pulls out of commonwealth games
टॅग Saina Nehwal
Next Stories
1 प्रतिस्पध्र्यासाठी रितूषा धोकादायक ठरणार -राणी
2 निको रोसबर्गला पोल पोझिशन
3 टेनिस लीग नियोजित वेळापत्रकानुसारच -भूपती
Just Now!
X