ऑलिम्पिक पदकविजेत्या पी.व्ही.सिंधू आणि सायना नेहवाल यांनी पाटणा येथे आयोजित ८१व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली आहे. मात्र देशभरातील अव्वल बॅडमिंटनपटूच्या सहभागामुळे पाटणाकरांना दर्जेदार बॅडमिंटनची पर्वणी मिळणार आहे.

श्रीकांतच्या अनुपस्थितीत प्रणॉयला अग्रमानांकन देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच लखनौत झालेल्या सय्यद मोदी ग्रां.प्रि. स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा समीर वर्मा प्रणॉयला कडवी टक्कर देऊ शकतो. सय्यद मोदी स्पर्धेत प्रणॉयला नमवत सनसनाटी विजयाची नोंद करणारा मुंबईकर हर्षिल दाणी कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे. गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करणारे आदित्य आणि प्रतुल जोशी राष्ट्रीय जेतेपद नावावर करण्यासाठी आतुर आहेत. मोदी स्पर्धेदरम्यान खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे साईप्रणीतच्या खेळण्याविषयी साशंकता आहे. किदम्बी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप आणि आरएमव्ही गुरुसाईदत्त दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नाहीत. अजय जयरामनेही स्पर्धेतून माघार घेतली आहे.

सायना, सिंधूच्या अनुपस्थितीत पी.सी. तुलसीवर लक्ष केंद्रित झाले होते. मात्र तिनेही स्पर्धेतून माघार घेतल्याने मुंबईकर तन्वी लाडला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. तन्वीला ऋत्विका शिवानी आणि रितुपर्णा दास यांत्यांच्याकडून टक्कर मिळण्याची शक्यता आहे. अरुंधती पानतावणेचे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झाले आहे.