फुलराणी सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू यांनी मलेशिया सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. या दोघांनी सकारात्मक सुरुवात केलेली असताना पुरुष गटात मात्र एच.एस. प्रणॉय आणि किदम्बी श्रीकांत यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
दुखापतीमुळे यंदा सायना बहुतांशी स्पर्धामध्ये सहभागी झाली नाही. मात्र दुखापतीतून सावरल्यानंतर दिल्लीत झालेल्या इंडिया खुल्या स्पर्धेत ती सहभागी झाली. चीनच्या ली झेरूईने उपांत्य फेरीच्या लढतीत तिला नमवले. या पराभवातून बोध घेत सायनाने मलेशिया स्पर्धेत दमदार सुरुवात केली. तृतीय मानांकित सायनाने थायलंडच्या निचॉन जिंदापोलवर २१-१६, २१-७ असा विजय मिळवला. जिंदापोलविरुद्ध सायनाचा हा सहावा विजय आहे. पुढच्या लढतीत सायनाची लढत कोरियाच्या बे येऑन ज्यु हिच्याशी होणार आहे.
सिंधूने चीनच्या हे बिंगजिओवर २१-१६, २१-१७ अशी मात केली. सहाव्या मानांकित सिंधूला गेल्या वर्षी इंडोनेशिया स्पर्धेत तर यंदा स्विस खुल्या स्पर्धेत बिंगजिओविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. विजयासह सिंधूने या पराभवांची परतफेड केली. पुढच्या लढतीत सिंधूसमोर कोरियाच्या स्युंग जि ह्य़ुआनचे आव्हान असणार आहे.
रिओ ऑलिम्पिकसाठी क्रमवारी गुणांची शर्यत तीव्र झालेली असताना किदम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय पहिल्याच फेरीत पराभूत झाल्याने भारताचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीत झालेल्या इंडिया खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा जपानच्या केंटो मोमोटाने प्रणॉयला २१-१९, २२-२० असे नमवले. चुरशीच्या लढतीत प्रणॉय आणि मोमोटा यांच्यात जोरदार मुकाबला रंगला. मात्र प्रणॉयचे प्रयत्न अपुरे ठरले.
गेल्या वर्षी इंडिया खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या श्रीकांतला यंदा सलामीच्या लढतीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते. मलेशिया स्पर्धेतही याचीच पुनरावृत्ती झाली. बुनसूक पोनसन्नाने श्रीकांतवर २३-२१, ९-२१, २१-१० अशी मात केली. पोनसन्नाविरुद्ध श्रीकांतची कामगिरी ३-१ अशी होती. मात्र बुधवारी झालेल्या लढतीत पोनसन्नाने बहारदार खेळ करत बाजी मारली.