रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी उत्सुक सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांनी मलेशिया सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. अन्य भारतीय खेळाडूंचे आव्हान बुधवारी संपुष्टात आल्याने या दोघींवरच भारताची भिस्त आहे.
तृतीय मानांकित सायना नेहवालने कोरियाच्या बेई येऑन ज्यू हिच्यावर २१-१०, २१-१६ असा विजय मिळवला. दिमाखदार खेळासह दोन्ही गेम्समध्ये सायनाने विश्रांतीपर्यंत ११-३ अशी आघाडी घेतली होती. या आघाडीच्या बळावर वाटचाल करत सायनाने बाजी मारली. बेईविरुद्धच्या १३ लढतींत सायनाने निर्भेळ यश मिळवले आहे.
सिंधूने कोरियाच्या स्युंग जि ह्य़ुआनवर २२-२०, २१-१७ अशी मात केली. पहिल्या गेममध्ये सिंधूने ९-६ आणि त्यानंतर २०-१८ अशी आघाडी मिळवली होती. मात्र स्युंगच्या आक्रमक खेळापुढे सिंधू शरणागती पत्करणार असे चित्र होते. मात्र शेवटच्या क्षणी खेळ उंचावत सिंधूने बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये सिंधू ६-८ अशी पिछाडीवर होती. त्या स्थितीतून झुंजार खेळ करत सिंधूने १५-१५ अशी बरोबरी केली. या टप्प्यातून सलग पाच गुणांची कमाई करत सिंधूने मॅचपॉइंट कमावला. स्युंगने दोन मॅचपॉइंट वाचवत परतण्याचा प्रयत्न केला, मात्र सिंधूच्या तडफदार खेळापुढे तो अपुरा ठरला.
तैपेईच्या ताइ झ्यू यिंगने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या लि झेरूईला नमवण्याची किमया केली. कॅरोलिन मारिन, सिझियान वांग आणि वांग यिहान या अव्वल खेळाडूंनीही अंतिम आठमध्ये आगेकूच केली. पुरुष गटात ली चोंग वेई, लिन डॅन, व्हिक्टर अक्सलेन, जॅन यॉर्गेसन यांनीही आपापल्या लढती जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

सायनाची आठव्या स्थानी घसरण
रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी शर्यत तीव्र झालेली असताना भारतीय बॅडमिंटनपटूंची जागतिक क्रमवारीत घसरण झाली आहे. सायनाची क्रमवारीत आठव्या स्थानी घसरण झाली आहे. पी.व्ही. सिंधूने मात्र एका स्थानाने सुधारणा करत १०व्या स्थानी झेप घेतली आहे. इंडिया खुल्या आणि मलेशिया सुपरसीरिज स्पर्धेत प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळावा लागल्याने किदम्बी श्रीकांतची १४व्या स्थानी घसरण झाली आहे. एच. एस. प्रणॉयची घसरण होऊन तो २२व्या स्थानी आहे. अजय जयरामची घसरण होऊन तो २४व्या स्थानी स्थिरावला आहे. मनू अत्री आणि सुमित रेड्डी जोडी १९व्या तर ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडी १५व्या स्थानी स्थिर आहे.