सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटूंनी महिला एकेरीत आपापल्या प्रतिस्पर्धीवर सोपा विजय मिळवीत आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पाचव्या मानांकित सायनाने इंडोनेशियाच्या फित्रियानीवर २१-१६, २१-१७ असा, तर सिंधूने इंडोनेशियाच्याच मारिया फेबे कुसुमास्तुतीवर २१-१०, २१-१३ असा विजय मिळवला.
जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या सायनासमोर पुढील फेरीत इंडोनिशियाच्या लिंडवेनी फॅनेट्री आणि थायलंडच्या निचाओन जिंदपोल यांच्यातील विजेतीचा सामना करावा लागेल. सिंधूला आठव्या मानांकित चायनीस तैपेईच्या ताई त्झू यिंगशी लढावे लागेल. सायना, सिंधू वगळल्यास भारताच्या इतर खेळाडूंनी निराश केले. कोरियाच्या चँग ये ना आणि ली सो ही यांनी महिला दुहेरीत भारताच्या ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पाचा २१-१५, २१-११ असा पराभव केला.
पुरुष दुहेरीतही मनू अत्री व बी सुमित रेड्डी यांना पराभव पत्करावा लागला. पाचव्या मानांकित जपानच्या हिरोयुकी इंडो आणि केनिची हयाकावा जोडीने भारतीय जोडीवर २१-१५, २१-१३ अशी कुरघोडी केली. याच गटात हाँग काँगच्या ऑर चीन चुंग आणि टॅँग चुन मन जोडीने २१-१९, २१-१७ अशा फरकाने प्रणव जेरी चोप्रा आणि अक्षय देवळकर या जोडीचे आव्हान संपुष्टात आणले. दरम्यान, पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतला पहिल्या फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले. बिगरमानांकित कोरियाच्या ली डाँग केऊनने त्याला १३-२१, २१-१२, २१-१९ असे एक तास व १५ मिनिटांत पराभूत केले.